नाशिक, 9 मार्च (हिं.स.)।
घटनेच्या मुलतत्वांचा आदर राखणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. संविधान व मुलभूत हक्कांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘गोष्ट संविधानाची’ ही ॲड.जयंत जायभावे यांची निर्मिती असलेली मालिका उपयुक्त ठरेल. केवळ हिंदी व इंग्रजीपुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक राज्यातील बार कौन्सिलने त्यांच्याकडील प्रादेशिक भाषांमध्ये ही मालिका उपलब्ध करुन द्यावी व ही माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवावी, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.
कॉलेजरोडवरील गुरुदक्षिणा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. संविधानाची जागृती व्हावी या उद्देशाने बार काउंन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांच्यावतीने जनजागृतीचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत संविधान म्हणजे काय? ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी ‘गोष्ट संविधानाची’ या शीर्षकाखाली ॲड. जयंत जायभावे यांनी निर्मिती केलेल्या मराठी मालिकेचे विमोपण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले, नव्या पिढीतील वकीलांनी केवळ उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी प्रयत्न करु नये. तर तालुका व जिल्हापातळीवरही प्रचंड वाव आहे. प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही आराखडा आखला असून, जुलै अखेरपर्यंत तिसरा टप्पा पूर्ण होणार आहे. तर चौथा व पाचवा टप्पा जुलै २०२६ पर्यंत पूर्ण होईल. प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी वकीलांनीदेखील मदत करताना न्याय व्यवस्थेवर असलेला विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी सहाय्यता करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सुदीप पाचबोला म्हणाले, संविधान साक्षरता अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा सन्मान राखणे हीदेखील एकप्रकारची देशसेवा आहे.
न्यायमुर्ती सारंग कोतवाल म्हणाले, संविधान हा लोकशाहीसाठी अमृत आहे. जोपर्यंत देशात संविधान आहे तोपर्यंत लोकशाही जिंवत आहे. अमृत महोत्सवानिमित्त या अमृताचा प्रचार-प्रसार करणे कौतुकास्पद आहे. न्यायमुर्ती मकरंद कर्णिक म्हणाले, न्याय मिळविण्याचा हक्क सर्वांना आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालय हे केंद्रबिंदू आहेत. जिल्हा न्यायालयाच्या वास्तु उभारणीचा आढावा घेताना त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे म्हणाले, न्यायव्यवस्थेने लोकशाहीचा मुलभूत अधिकार जपण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यावरण, राजकारणासह अन्य विविध क्षेत्रांमध्ये निर्णायक निकाल आजतागायत दिलेले आहेत. आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर तसेच इतर आव्हानांचा सामना करताना ‘गोष्ट संविधानाची’ सारख्या उपक्रमाचा फायदा होईल.
या कार्यक्रमावेळी दिग्दर्शक अभिजित शिंदे आणि मुलाखतकार अश्विनी देशपांडे यांचा सत्कार झाला. तसेच स्मरणिकेचे प्रकाशन झाले. त्यावेळी सहसंपादिका ॲड.सुनिता निकम-पांचाळ, ॲड. सानिका ठाकरे उपस्थित होत्या.या कार्यक्रमानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमुर्ती . महेश एस. सोनक यांचे संविधानात वेळोवेळी झालेल्या दुरुस्त्यांबाबत व्याख्यान झाले. कार्यक्रमात गोखले एज्युकेशन सोसायटी न. ब. ठाकुर लॉ कॉलेज, नाशिक आणि अॅड. द. तु. जायभावे यांचे स्मृतीप्रित्यर्थ मुट ट्रायल अॅण्ड जजमेंट राईटिंग कॉम्पिटिशनचा बक्षिस वितरण समारंभ झाला.