नवी दिल्ली, 07 मार्च (हिं.स.) : रस्ते अपघातांसाठी सिव्हिल इंजिनिअर्स, सल्लागार आणि सदोष सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) जबाबदार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. नवी दिल्ली येथे गुरुवारी ग्लोबल रोड इन्फ्राटेक समिट अँड एक्स्पोमध्ये ते बोलत होते.
यासंदर्भात गडकरी म्हणाले की, किरकोळ चुका आणि रस्त्याची खराब रचना अपघातांसाठी कारण ठरत आहेत. तरीही यासाठी कोणालाही जबाबदार धरलेले जात नाही. वाढत्या रस्ते अपघातांच्या समस्येला तोंड द्यावे लागणे हे आपल्यासाठी चांगले नाही. देशात दरवर्षी 4 लाख 80 हजार रस्ते अपघात होतात. तर त्यात 1 लाख 80 हजार मृत्यू होतात. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहेत. यापैकी 66.4 टक्के मृत्यू हे 18 ते 45 वयोगटातील आहेत. यामुळे जीडीपीचे 3 टक्के नुकसान झाले आहे. रस्ते अपघातात डॉक्टर, अभियंते आणि महत्त्वाच्या व्यक्ती, प्रतिभावान तरुणांचा मृत्यू होणे हे आपल्या देशासाठी खरोखरच मोठे नुकसान असल्याची खंत गडकरी यांनी व्यक्त केली.
रस्ते बांधणीबाबत नियोजनाचा अभाव आणि डिझाइनसाठी सिव्हिल इंजिनिअर्स जबाबदार आहेत. या सर्व अपघातांना सिव्हिल इंजिनिअर्स दोषी आहेत. पण मी यासाठी सर्वांना दोष देत नाही. परंतु, 10 वर्षांच्या अनुभवानंतर मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की जे डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) बनवतात त्यांनाच प्रमुख दोषी ठरवावे लागले. त्यात हजारो चुका असतात. माझे मत आहे की हे असे अहवाल देणाऱ्या लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला पाहिजे असे गडकरींनी सांगितले. स्पेन, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांच्या तुलनेत भारतात रस्ते सूचना फलक आणि चिन्हांकन प्रणाली अपुरी असल्याचे त्यांनी नमूद केले. रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी त्यांनी उद्योगांना चांगले तंत्रज्ञान आणि शाश्वत बांधकाम साहित्याचा अवलंब करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.