जळगाव, 17 मार्च (हिं.स.) जामनेरआर्थिक विवंचनेत सापडलेल्या किन्ही येथील शेतकरी शांताराम सुपडू आवारे (वय ४६) यांनी आपल्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. शांताराम आवारे हे गेल्या काही वर्षांपासून शेतीसाठी घेतलेल्या कुक्षी कर्जासह खाजगी सावकारी कर्जाच्या बोजाखाली दबले होते. वाढत्या आर्थिक अडचणींमुळे ते मानसिक तणावात होते. अखेर दुपारी घरच्यांना काहीही न सांगता ते शेतात गेले आणि आत्महत्येचा निर्णय घेतला.
शेतालगतच त्यांचे काका दिलीप आवारे यांचे शेत आहे. शेताच्या बांधावर काम करत असताना त्यांना झाडाला लटकलेली शांताराम यांची मृतदेह दिसला. तातडीने त्यांनी कुटुंबीयांना याची माहिती दिली. शांताराम यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वडील असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत फत्तेपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास स.पो.निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. तुपार इंगळे करत आहेत.