अमरावती, 27 मार्च (हिं.स.)।एसटीच्या तपोवन कार्यशाळेत १७ इलेक्ट्रिक एसटी बसेस एकाचवेळी चार्ज करता येतील, इतपत सुविधा निर्माण झाली आहे. आता केवळ इलेक्ट्रिक बसेस एसटी महामंडळ केव्हा पाठवणार याचीच प्रतिक्षा सुरू आहे. अमरावती एसटी विभागाने पहिल्या टप्प्यात २५ बसेस मागितल्या आहेत. मात्र, प्रति कि.मी.भाडे दर अद्याप निश्चित होत नसल्याने घोडे अडले आहे. येत्या काही दिवसांत यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले की, त्यानंतर इलेक्ट्रिक बसेस एसटी डेपोत दाखल होतील, अशी माहिती एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाद्वारे देण्यात आली.
तरीही इलेक्ट्रिक एसटी बसेस जिल्ह्यात दाखल होण्यास किमान २० दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. चार्जिंग स्टेशनचे काम सुमारे ८ महिने रखडल्यामुळे नागपूर-अमरावती इलेक्ट्रिक बस सेवा सुरू झाली नाही. कारण ही बस एकदा चार्ज केल्यानंतर किमान २८० ते ३०० कि.मी.धावते. परंतु, अमरावती-नागपूर हे अंतर सुमारे १६० कि.मी.असल्याने नागपुरातून अमरावतीत आलेली इलेक्ट्रिक एसटी बस परत पाठवण्याआधी तिला चार्ज करावेच लागेल. तसेच इलेक्ट्रिक बसेस सुरू झाल्यानंतर या बसची अमरावतीहून नागपूरसाठी रात्रीची फेरीच ठेवावी लागेल.
नागपुरात पोहोचलेली बस रात्रभर चार्ज होऊन सकाळी निघेल. दिवसा इतर वेळी जर इलेक्ट्रिक बस नागपुरात पाठवली तर तिला चार्ज करण्यासाठी किमान ३ तास चालक, वाहकांना खोळंबून राहावे लागेल. त्यामुळे दिवसभरात एकच फेरी होईल. तसेच चालकाचाही वेळ वाया जाईल, अशी माहितीही विभागीय नियंत्रक कार्यालयाद्वारे देण्यात आली. बस ही एकदा चार्ज केल्यानंतर २८० ते ३०० कि.मी. धावते. त्याचप्रमाणे ही पूर्णत: एसी बस असल्यामुळे तिचे भाडे हे शिवशाहीसारखेच राहणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण बस चार्ज करण्यासाठी ३ तासांचा कालावधी लागतो. ते बघूनच फेऱ्यांचे नियोजन केले जाणार आहे. अमरावतीत चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात प्रथम अचलपूरपर्यंत प्रवासी फेरी सुरू केली जाणार आहे.
लवकरच ई-बस सुरू केली जाणार
एसटीच्या तपोवन येथील कार्यशाळेत चार्जिंग स्टेशन तयार आहे. केवळ व्यवस्थापन इमारतीचे काम काहीसे शिल्लक आहे. ते पूर्ण झाले की, लगेच इलेक्ट्रिक एसटी बसेसची मागणी केली जाईल. त्या लवकरच मिळतील अशी अपेक्षा आहे.
– नीलेश बेलसरे, विभागीय एसटी नियंत्रक.