वॉशिंगटन , 4 मार्च (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला देण्यात येणारी सर्व लष्करी मदत थांबवण्याचे आदेश दिले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या संघर्षानंतर काही दिवसांतच हा आदेश आला आहे.
ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत, झेलेन्स्की यांनी रशियासोबतच्या कोणत्याही शांतता कराराची खात्री करण्यासाठी सुरक्षा हमीची मागणी केली. यावर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आणि युक्रेन शांततेसाठी तयार असेल तेव्हाच परत यावे असे म्हटले. या तणावपूर्ण बैठकीनंतर, युरोपीय मित्र राष्ट्रांनी युक्रेनला शस्त्रे पुरवण्याची आणि शांती सैनिक पाठवण्याची योजना तातडीने सुरू केली.मात्र ट्रम्पच्या आदेशानंतर, युरोपीय मित्र राष्ट्रांनी युक्रेनला मदत करण्याच्या त्यांच्या योजनांवर पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे. जरी युरोपकडे अमेरिकेइतके लष्करी संसाधने नसली तरी ते शक्य तितक्या लवकर मदत देण्याचा प्रयत्न करत आहेत. युरोपियन अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा फक्त उन्हाळ्यापर्यंतच राहील.
“झेलेन्स्की शांततेसाठी सद्भावनेने वचनबद्ध आहेत की नाही हे ट्रम्प ठरवत नाहीत तोपर्यंत अमेरिका युक्रेनला देण्यात येणारी सर्व लष्करी मदत थांबवत आहे.”असे संरक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. रशिया आणि युक्रेनमधील तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध लवकरात लवकर संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प शांतता करारावर जोर देत आहेत. मात्र, झेलेन्स्कीच्या सुरक्षेच्या मागणीमुळे करार गुंतागुंतीचा झाला आहे. शांतता करार प्रक्रिया पुढे सरकत नाही
तोपर्यंत अमेरिकेकडून कोणतीही मदत दिली जाणार नाही, अशी घोषणा ट्रम्प यांनी आधीच केली होती.अमेरिकेचा हा निर्णय युक्रेनला आर्थिक मदत बंद करण्यापेक्षाही जास्त आहे. यामुळे आधीच पुरवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या लष्करी मदतीलाही धोका निर्माण होतो. याशिवाय, अमेरिका आणि युक्रेनमध्ये एक करार होणार होता, ज्याअंतर्गत अमेरिकेला युक्रेनच्या नैसर्गिक संसाधनांमधून भविष्यातील उत्पन्नाचा मोठा वाटा मिळणार होता. तथापि, शुक्रवारच्या बैठकीनंतर हा करार तुटत असल्याचे दिसून आले.