मुंबई, 8 एप्रिल (हिं.स.)।बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या स्त्री’ चित्रपटाच्या प्रचंड यशाने तिची फॅन फॉलोइंग आणखी वाढली. ‘स्त्री’चे आतापर्यंत दोन भाग प्रदर्शित झाले असून, दोन्ही सुपरहिट ठरले. मात्र, नुकत्याच झालेल्या एका वादामुळे दिग्दर्शक अमर कौशिक चर्चेत आले आहेत. त्यांनी श्रद्धाच्या हसण्याची तुलना चुडैलबरोबर केली होती, ज्यानंतर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता त्यांनी श्रद्धाची माफी मागितली आहे.
एका इव्हेंटमध्ये श्रद्धा कपूर आणि दिनेश विजन यांची भेट झाली. यावेळी पापाराझ्झीसमोर श्रद्धा म्हणाली, “आजकाल हे खूप जोक मारत आहेत.” यावर अमर कौशिक यांनी लगेच कान धरून श्रद्धाची माफी मागितली. या घटनेने चाहत्यांचे लक्ष वेधले असून, अमर यांच्या माफीमुळे हा वाद आता शमण्याची चिन्हे दिसत आहेत.
कोमल नहाटा यांच्याशी झालेल्या संवादात अमर कौशिक यांनी ‘स्त्री’मध्ये श्रद्धा कपूरला का निवडले, याचा खुलासा केला. अमर म्हणाले, “श्रद्धाला कास्ट करण्याचे संपूर्ण श्रेय निर्माता दिनेश विजन यांना जाते. ते श्रद्धाला एका फ्लाइटमध्ये भेटले होते. त्यांनी मला सांगितलं, ‘अमर, ती अगदी स्त्रीसारखी, म्हणजे एकदम चुडैलबरोबर हसते.’ या विधानानंतर सोशल मीडियावर अमर यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. नेटकऱ्यांनी हे असभ्य आणि अपमानजनक असल्याचे म्हटले होते.