नाशिक, 12 एप्रिल (हिं.स.)।
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संवाद आवश्यक आहे. भगवान महावीर यांचे विचार आजही आणि भविष्यातही लोकशाहीला पूरक आहेत. वसुदेव कुटुंबकम हे बोलण्यापुरतेच असुन सरकार इतर धर्मांना देत असलेली वागणूक आपण अनुभवत असल्याचे प्रतिपादन खा. प्रणिती शिंदे यांनी केले.
परशुराम सायखेडकर नाट्यगृहात भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेत दुसरे पुष्प खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकशाहीची सद्यस्थिती या विषयावर गुंफले. व्यासपीठावर खासदार शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, काँग्रेस नेते ज्ञानेश्वर गायकवाड, संयोजक गौतम सुराणा, सुनील बुरड, सुभाष लूणावत, गुरुमीत बग्गा, अधिकारी सुरेशकुमार काले, सोनल दगडे ( कासलीवाल) आदी उपस्थित होते. खा. शिंदे म्हणाल्या की , भगवान महावीर हे सर्व जीव, किटाणू , पशु, पक्षी यांचे रक्षण करतात.
त्यांच्या धर्मनिरपेक्षता हा गुण सर्वांनीच आचरणात आणावा. महापुरुषांना जाती, धर्मात वाटून घेणे हे दुर्दैवी आहे. वोट बँक साठी सर्व काही सुरू असलेले प्रयत्न हाणून पडण्याची गरज आहे. व्याख्यान माला ही एक चळवळ आहे. छोटासा प्रयत्न असून, पुढे १० लोकांचा ग्रुप बनवून खेडो पाडी, तालुक्याला जाऊन लोकांमध्ये लोकशाही चे विचार पोहोचवा.
सोलापुरात जैन समाज माझ्याबरोबर आहे. या समाजातील १८ वर्षाच्या मुली दीक्षा घेतात, त्यामुळे हा किती मोठा त्याग आहे. धर्मासाठी जीवन समर्पित करणे, ही जैन समाजाकडून मिळालेली शिकवण आहे. भगवान महा वीर यांचे बहुमूल्य युनिव्हर्सल विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा असे आवाहनही खा. प्रणिती शिंदे यांनी केले.