मुंबई, 04 मार्च (हिं.स.) : संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी . सोमवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंडे यांचे ओएसडी प्रशांत जोशी यांनी यांनी आज, मंगळवारी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांकडे मुंडेंचा राजीनामा सोपवला.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. मुंडे यांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन वाल्मिक कराडकडे होते, असा दावा केला जातो. राजकीय अभय, वरदहस्त असल्याने कराडने बीडमध्ये गुन्हे केले आणि पचवले असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. वाल्मिक कराड आरोपी असल्याने या प्रकरणी तपास योग्य रीतीने होणार नाही, असेही विरोधकांनी म्हणत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती.
या भेटीत त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले. धनंजय मुंडे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील असा दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता. मात्र, मुंडेंनी राजीनामा न दिल्याने त्यांचा दावा फोल ठरला होता. त्यानंतर करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून तो दोन तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असा नवा दावा केला होता. अखेर आज मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. मुंडे यांचा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यांना मंत्रिपदाच्या कार्यभारातून मुक्त केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले