चंद्रपूर, 13 एप्रिल (हिं.स.)।
विदर्भातील अष्टशक्ती पिठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या चंद्रपुरातील महाकाली देवीच्या यात्रेत सुमारे ६ लाख भाविक महाकालीला नतमस्तक झाले असल्याची माहिती समोर आली आहे. हा आजवरचा यात्राकाळातील भाविकांचा सर्वात मोठा आकडा ठरला आहे. दरम्यान यात्रेतील भक्तांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे.
चैत्र शुल्क षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेस ३ एप्रिलपासून मोठ्या थाटात प्रारंभ झाला. महाकाली देवीची मोठी बहीण म्हटल्या जाणाऱ्या एकविरा देवीचाही घट महाकाले परिवाराच्या वतीने बसविण्यात आला. यात्रेनिमित्त राज्यातून भाविक शहरात दाखल झाले. त्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाला होता. डफरीच्या तालावर पोतराजे महाकाली देवीचे गोडवे गात होते. अनेकांनी देवीला बोलल्याप्रमाणे नवसही फेडले. ‘जय हो महाकाली चांदावासिनी… दुर्पत माय’च्या गजरात भाविकांनी पवित्र स्नानानंतर महाकालीचे दर्शन घेतले.
शनिवारी महापुजेला नेहमीप्रमाणे पौर्णिमेनिमित्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिराच्या विश्वस्थ आशाताई महाकाले यांच्या हस्ते परंपरेप्रमाणे झालेल्या पुरणाच्या महाआरतीनंतर गाभाऱ्यात स्थापन करण्यात आलेला देवीचा घट हलविल्यावर श्रीफळ फोडून अर्पण करण्यात आले. त्यानंतर दहीभात शिंपडत यात्रेकरुंचा परतीचा प्रवास सुरू झाला.
यावेळी मोठ्या संख्येने भाविक देवीला नतमस्तक झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मागील वर्षी ३ लाख भाविकांनी यात्रा काळात हजेरी लावली होती.
डफ वाजवत महाकाली देवीचा महिमा गाण्यात आला. यात्रेसाठी नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद,लातूर, तेलंगण, आंध्रप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक चंद्रपुरात आले होते .
——
बुधवार गोतांबिल –
देवीचे भक्त देवकर व देवकरीण आंबिल घेतल्याशिवाय जात नाही अशी परंपरा आहे. यंदा बुधवारी गोतांबिल घेऊन जाणार असल्याचे सूत्रांनी ‘हिंदुस्थान समाचार’शी बोलताना सांगितले.