==
अमरावती, 17 मार्च (हिं.स.)।
बेलोरा विमानतळास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे या मागणीसह इतर मागण्यांकरिता शाहू, फुले, आंबेडकर, भाऊसाहेब देशमुख फाऊंडेशन अमरावतीचे वतीने १९ मार्चला मोठ्याप्रमाणात सर्वधर्मिय समाजबांधवांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
बेलोरा विमानतळास डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे, तसेच भाऊसाहेब देशमुख यांचा पुर्णाकृती पुतळा, बेलोरा विमानतळावर स्थापन करण्यात यावा व डॉ. भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न देवून सन्मानित करण्यात यावे, ही मागणी विविध संस्था संघटनांकडून गेल्या ४ ते ५ वर्षांपासून करण्यात येत आहे.
१३ जुलै २०१९ रोजी बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रसंगी तात्कालीन आमदार डॉ. सुनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, बेलोरा विमानतळास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे, विमानतळाच्या दर्शनी भागात डॉ. पंजाबराव देशमुख यांचा पुर्णाकृती पुतळा व डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन तात्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले होते. या मागण्यांचा, मी सकारात्मक विचार करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास सांगितले होते. येणाऱ्या एप्रिल महिन्यात विमानतळ सुरू होणार असल्याचे जाहीर झाले आहे.
डॉ. भाऊसाहेब देशमुख, देशाचे प्रथम कृषीमंत्री होते, त्याचबरोबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत संविधान निर्मितीत सदस्य म्हणून त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका पार पाडली आहे.भाऊसाहेबांना मानणारा वर्ग फार मोठा असून, अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात, विदेशातसुध्दा आहे.बेलोरा विमानतळास डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचे नाव देण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेने व महानगरपालिकेने सर्वानुमते ठराव पारीत केले आहेत. ही वास्तविक विचारात घेऊन बेलोरा विमानतळास डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचे नाव देण्यासाठी बुधवारी १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्वधर्मिय समाजबांधवांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तेव्हा नागरिकांनी मोठ्याप्रमाणात डॉ. भाऊसाहेब देशमुखांच्या संदर्भातील मागण्या पूर्ण होण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन शाहू, फुले, आंबेडकर, भाऊसाहेब देशमुख फाऊंडेशन अमरावतीच्या वतीने करण्यात आले आहे.