वॉशिंग्टन, 6 मार्च (हिं.स.)।अमेरिकेत एमएस शिकणाऱ्या एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील जी प्रवीण हा तरुण अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी शहरात मृतावस्थेत आढळला. प्रवीणच्या शरीरावर गोळ्या लागल्या होत्या, परंतु त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या घटनेची माहिती प्रवीणच्या कुटुंबीयांनी दिली.
प्रवीण मिलवॉकीमध्ये मास्टर ऑफ सायन्स (एमएस) करत होता. बुधवारी(दि. ५) सकाळी त्याने त्याच्या वडिलांना फोन केला होता. मात्र, जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा त्याचे वडील झोपले होते आणि त्यांनी फोन उचलला नाही. नंतर, भारतीय वेळेनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी प्रवीणच्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिली. प्रवीणचे नातेवाईक अरुणने सांगितले की, काही मित्रांनी प्रवीणच्या शरीरावर गोळ्या लागल्याची माहिती दिली. त्यांनी असेही सांगितले की, काही लोकांनी सांगितले की अज्ञात हल्लेखोरांनी एका दुकानात घुसून प्रवीणवर गोळ्या झाडल्या, परंतु प्रवीणच्या हत्येचे कारण काय होते हे अजून स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच प्रवीणच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबातील सदस्य सध्या मदतीसाठी आमदार आणि इतर नेत्यांशी संपर्क साधत आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांनी मृत्यूचे खरे कारण शोधून काढावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी त्यांची इच्छा आहे.