नाशिक, 5 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या, रविवारी (दि.६) नाशिक दौर्यावर असून रामनवमीचा मुहूर्त साधत ते पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराला भेट देत प्रभू श्रीराम चरणी लीन होणार आहे. वक्फ विधेयकावरुन मुस्लीम धार्जिणे असा आरोप होत असताना सपकाळ हे रामाचे दर्शन घेत सॉफ्ट हिंदुत्वाचा संदेश देतील, असे बोलले जात आहे. विधानसभेत कॉग्रेसचा सुपडा साफ झाल्यानंतर पक्षाकडून नाना पटोले यांना हटवून हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच नाशिक दौरा आहे.
रविवारी ते नाशिक दौर्यावर आहेत. या दिवशी रामनवमी असून हा मुहूर्त साधत ते श्री काळारामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच ते एमजी रोड येथील काँग्रेस कमिटीत जिल्हा व शहर काँग्रेसची एकत्रित बैठक घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच दिवसभरात ते शालिमार येथील रमाबाई आंबेडकर वसतीगृह व पेठरोड येथील नामको रुग्णालयाला भेट देणार असल्याचे कळते. सपकाळ यांच्या स्वागताची पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
विधानसभेला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पक्षाचा पराभव झाल्याने कॉग्रेसमध्ये मरगळ पहायला मिळत आहे. त्यामुळे सपकाळ यांचा दौरा नाशिक कॉग्रेससाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष पद स्विकारल्यापासून त्यांनी राज्यातील महायुती त्यातही भाजप व शिवसेना शिंदे गटाविरुध्द आक्रमक पवित्रा घेत राज्यातील गुन्हेगारीवरुन धारेवर धरले आहे. त्यामुळे नाशिक दौर्यात ते काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे. —————