नागपूर, 22 मार्च (हिं.स.) : नागपुरात 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपींकडून झालेल्या नुकसानाची भरपाई वसूल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दंगल प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आज, शनिवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, सोशल मिडीयावरील वादग्रस्त अफवेमुळे नागुरात हिंसाचार घडला. यातील 104 आरोपींची ओळख पटवून 92 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचारादरम्यान झालेली नुकसान भरपाई येत्या 3 ते 4 दिवसांत दिली जाईल. या हिंसाचारात झालेल्या सर्व नुकसानाची भरपाई दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. आणि ती दिली नाही तर संपत्ती जप्त केली जाईल. तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्यास कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूर हे शांतीप्रिय शहर असून समाजकंटकांना आत्ताच सरळ केले नाही तर राज्यात यापुढे देखील असे प्रकार घडू शकतात. नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेड, मोबाईल चित्रीकरण, पत्रकारांनी दिलेले चित्रीकरण यानुसार कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 92 आरोपींना अटक केली असून त्यात 12 अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे. त्यांच्यावरदेखील कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आंदोलकांनी औरंगजेबची प्रतिकात्मक कबर जाळली. त्यांसदर्भात तक्रार दाखल करून घेण्यात आली होती. परंतु, कबर जाळत असताना ‘कुराण’मधील ‘आयत’ लिहिलेली चादर जाळली असा खोटा प्रचार सोशल मीडियावर झाला. त्यामुळे नागपूरमध्ये जमवाजमव झाली आणि त्यानी गाड्या फोडल्या, त्यानंतर दगडफेक झाली. यावर पोलिसांनी 4 तासांत याच्यावर आवर घातला. पोलिसांनी अश्रू कांड्या आणि जे आवश्यक प्रतिबंध होते त्याचा वापर केला, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
नागपुरात 1992 नंतर पद्धतीची दंगल झाली नाही, नागपूरच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप करावा लागणार त्यांना कडक शिक्षा केली जाणार आहे, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. काही पोस्टमध्ये अश्या गोष्टी समोर आल्या ज्या बांगलादेशी वाटतात पण आज यात बांगलादेशचा हाथ आहे असे म्हणता येणार नाही. या हिंसाचारात मालेगाव कनेक्शन समोर आल्याचे फडणवीस म्हणाले. दंगलीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी अभद्र कृत्य झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, मी पोलीस आयुक्तांनी असे कुठलेही अभद्र कृत्य झाले नसल्याचे सांगितले. महिला पोलिसांवर दंगलखोरांनी दगडफेक केल्याचे पोलिस आयुक्तांकडून सांगण्यात आलेय.