नाशिक, 4 एप्रिल (हिं.स.) : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅनीफॅक्चरर्स असोसिएशन निमा आणि अंबड इंडस्ट्रीस अँड मॅनीफॅक्चरर्स असोसिएशन आयमा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष .सिद्धेश रामदास कदम यांच्यासोबत औद्योगिक क्षेत्रातील विविध विषयांवरती बैठक झाली.
निमा अध्यक्ष आशिष नहार व आयमा अध्यक्ष ललित बूब यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष .सिद्धेश कदम यांचे स्वागत करीत नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील अनेक वर्षापासून अपेक्षित असलेला सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे हि विनंती केली. येत्या कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून गोदावरी स्वच्छतेला प्राधान्य देऊन सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचा मुद्दा देखिल सोडविणे अत्यंत गरजेचे असल्याचे आशिष नहार यांनी नमूद केले.
निमा सहसचिव किरण पाटील यांनी प्रस्तावीत मोठ्या आकाराच्या डिझेल जनरेटरच्या प्रदूषण नियंत्रण नियमावली खूपच खर्चिक व अनावश्यक असल्याचे सांगत गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धर्तीवर अटी शिथिल करण्याची गरज असल्याचे सुचविले. राजेंद्र पानसरे यांनी नाशिकला सी.ई.टी.पि. नसल्यामुळे नवीन गुंतवणूक देखील थांबली असल्याचे अधोरेखीत केले.त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळ,उद्योजक, महापालिका आदी संलग्न पदाधिकाऱ्यांसह उपसमित्या कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून स्थापने गरजेचे आहे असे उद्योजकांनी यासह विविध मुद्द्यावर चर्चा केली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत विविध अडचणी सतत संपर्कात राहून सोडविण्याचे आश्वासन दिले. लवकरच उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यालयात देखील बैठकीला आमंत्रित केले. बैठकीला निमा उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, निमा सचिव राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, किरण पाटील, गोविंद झा, मिलिंद राजपूत, विनायक गोखले तसेच प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड , रवींद्र आंधळे,उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, एम.आय.डीसी. कार्यकारी अभियंता जयवंत पवार आदी उद्योजक उपस्थित होते.