मुंबई, 13 मार्च (हिं.स.)। : महाराष्ट्र राज्य हे परकीय थेट गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे. केवळ नऊ महिन्यांत १ लाख ३९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. स्टार्टअप्सच्या संख्येत आणि गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र नवीन विक्रम प्रस्थापित करत असल्याने आता भारताची नवी स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
टीआयईकॉन मुंबई यांच्यावतीने आयोजित टीआयईकॉन् मुंबई २०२५: “धंदा फर्स्ट” या देशाच्या आघाडीच्या उद्योजकीय नेतृत्व शिखर संमेलन कार्यक्रमात पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “टीआयई मुंबई हॉल ऑफ फेम” पुरस्कार इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मंचावर टीआयई मुंबईचे संस्थापक अध्यक्ष हरीश मेहता, हवस मीडिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय मोहन, टीआयई मुंबईचे अध्यक्ष रानू वोहरा, डॉ. अपूर्व रंजन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी हरीश मेहता यांच्या ‘अतुलनीय’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना पुरस्कार समर्पित करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हा पुरस्कार २०१४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केलेल्या कामाची पोचपावती आहे. महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि ‘एमएमआर’ क्षेत्रात दिसणारे सर्व पायाभूत प्रकल्प, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, वाढवण प्रकल्प हे सुशासनाचे प्रतिक आहेत.
वाढवण बंदर जेएनपीटी बंदराच्या तुलनेत तीनपट मोठे असेल, जे भारतातील एक मोठे बंदर आहे. या बंदराचे काम सुरू करण्यात आले असून ते फक्त बंदर नसेल, तर त्याच्याबरोबरच एक विमानतळ देखील उभारले जाईल. त्याठिकाणी बुलेट ट्रेन स्टेशन असेल. वाढवण बंदराच्या परिसरात चौथी मुंबई साकारली जाईल.
जलसंधारण क्षेत्रात काम करताना सहा वेगवेगळ्या विभागांद्वारे १४ विविध जलसंधारण योजना राबवल्या जात होत्या. त्या एकत्र करून एकच योजना तयार केली आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून २५,००० गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरवले. लोकसहभागाच्या जोरावर या अभियानातून २०१९ पर्यंत २०,००० गावांनी जलसंधारणाचे नियोजन केले, जलसाठ्याची निर्मिती केली आणि दुष्काळमुक्त झाली. या योजनेमुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही भूजल पातळी वाढली असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
आदर्श नेतृत्व
महाराष्ट्र राज्याच्या पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक वाढ आणि जलसंधारण क्षेत्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे अनेक प्रकल्प, योजना राबवत आहेत. ज्यामध्ये रस्ते, मेट्रो, रेल्वे आणि शहरी वाहतूक यांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील दळणवळण आणि लोकांच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे.