पुणे, 31 मार्च (हिं.स.)।प्रधानमंत्री जन आरोग्य विभागाकडून पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळविण्यासाठी आयुष्मान भारत हा उपक्रम सुरू आहे. हे कार्ड काढण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरून आयुष्मान भारतसाठी रजिस्ट्रेशन करून हे कार्ड काढले जात आहे. १०० टक्के नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनिंग दुकानदार, आशा स्वयंसेविका, महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हे कार्ड नागरिकांना मोफत काढून देणे बंधनकारक आहे.
सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात आशा स्वयंसेविका यांच्याकडून आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास ४,१००० लोकसंख्या असून २४,८७२ नागरिकांनी हे आयुष्मान भारत कार्ड काढून आपले विमा संरक्षण अबाधित केले आहे. मात्र, रेशनिंग कार्डमध्ये ज्यांची नावे ऑनलाइन प्रक्रियेत समाविष्ट आहेत. ती संकेतस्थळावर आहेत, केवळ त्यांचेच आयुष्यमान भारत कार्डसाठी नोंदणी होत आहे. ते कार्ड निघत आहे. दुसऱ्या टप्प्यात ऑफलाइन कार्ड धारकांनी केवायसी पूर्तता करून ऑनलाइन प्रक्रियेत नाव समाविष्ट केली असली तरी अद्याप ती नावे प्रधानमंत्री जन आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर अपडेट झाली नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड वारंवार प्रयत्न करूनही निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे.