भारताने आक्षेप नोंदवत केला चीनच्या कृत्याला विरोध
लोकसभेत केंद्र सरकारची लेखी उत्तरातून माहिती
नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.) : कुरापतखोर चीने भारताच्या विरोधात कारवाया सुरुच ठेवल्या आहेत. चीनने लद्दाखला लागून असलेल्या सीमावर्ती भागात 2 नवीन काउंटी (वस्त्या) स्थापन केल्या आहेत. या काऊंटीचा काही भाग भारताच्या लद्दाख प्रदेशात येतो. केंद्र सरकारकडून याबाबत शुक्रवारी लोकसभेत लेखी माहिती देण्यात आली.
चीनने लडाखमध्ये भारतीय भूभागाचा समावेश करुन होटन प्रांतात दोन नवीन काउंटी स्थापन केल्या आहेत याची सरकारला कल्पना आहे का ?, जर असेल तर, याचे निराकरण करण्यासाठी सरकारने धोरणात्मक आणि राजनैतिक पातळीवर काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताने परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
यासंदर्भातील लेखी उत्तरात नमूद केल्यानुसार चीनच्या होटन प्रांतात तथाकथित 2 नवीन काउंटी स्थापन केल्याबाबत चीनच्या घोषणेची भारत सरकारला कल्पना आहे. या तथाकथित नवीन काउंटींच्या अधिकारक्षेत्राचा काही भाग भारताचा केंद्रशासित प्रदेश लद्दाखमध्ये येते
या प्रश्नात भारताने चीनच्या नवीन काउंटीच्या स्थापन करण्याच्या कृती विरोधात नोंदवलेल्या निषेधांची माहिती आणि त्यावर चीन सरकारकडून मिळालेल्या प्रतिसादांची माहितीदेखील मागितली आहे. केंद्र सरकार सीमा भागांच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी काळजीपूर्वक आणि विशेष लक्ष देत आहे, जेणेकरून या भागांचा आर्थिक विकास सुलभ होईल आणि भारताच्या धोरणात्मक आणि सुरक्षेबाबतच्या आवश्यकता पूर्ण होतील असे राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे. भारताच्या सुरक्षेबाबतच्या सर्व घडामोडींवर सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. तसेच भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे, असे राज्यमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे.—————————-
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी