रायपूर, 31 मार्च (हिं.स.) : छत्तीसगडमधील दंतेवाडा विजापूर सीमेवर आज, सोमवारी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. रेणुका उर्फ बानू असे महिला नक्षलीचे नाव आहे. पोलिसांनी तिच्यावर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव रॉय यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दांतेवाडा आणि विजापूरच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळी 9 वाजेपासून चकमक सुरू आहे. याबाबत दंतेवाडा पोलिस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले की, बस्तर प्रदेशातील दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जंगलात सकाळी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी बाहेर पडले होते. तेव्हा ही चकमक सुरू झाली. चकमकीत रेणुका उर्फ बानू नावाचा एक नक्षलवादी ठार झाली. तिच्यावर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. चकमकीच्या ठिकाणाहून एक इन्सास रायफल, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक गौरव रॉय म्हणाले की, आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणाहून एका महिला नक्षलवादीचा मृतदेह सापडला आहे. तिच्याकडून एक रायफल, दारूगोळा आणि दैनंदिन वापराच्या इतर वस्तूही सापडल्या आहेत. नक्षलवादीविरोधी कारवाई अजूनही सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे. चकमक संपल्यानंतर अधिक माहिती उपलब्ध होईल. दरम्यान रविवारी विजापूर जिल्ह्यात 50 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यापैकी 14 जणांवर एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस होते.