मुंबई, 28 मार्च (हिं.स.)।
श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा ‘मी पाठीशी आहे’ चित्रपट येत्या २८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात येत आहे. चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळण्यास विलंब झाल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतीत निर्माते मयूर अर्जुन खरात, ॲड. शुभांगी किशोर सोनवले, प्रमोद नंदकुमार मांडरे, शितल सोनावणे, ऋतुजा नरेंद्र कदम, अनिल गावंड आणि केतन कल्याणकर, दिग्दर्शक पराग सावंत यांनी नाराजी व्यक्त केली असून नुकतीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेतली. सेन्सॉरबोर्डकडून होणाऱ्या विलंबामुळे मराठी चित्रपटांचे नुकसान होत आहे. हीच नाही तर अशा अनेक समस्यांचा सामना निर्मात्यांना करावा लागत असल्याने मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड असावा, अशी मागणी अमेय खोपकर यांनी सरकारला केली आहे. तसेच यावेळी अमेय खोपकर यांनी सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्याला सेन्सॉर सर्टिफिकेट देण्यास विलंब केल्यामुळे धारेवर धरत लवकरात लवकर ‘मी पाठीशी आहे’ चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट देण्याचे आदेशही दिले.
या प्रकरणाबतात दिग्दर्शक पराग सावंत म्हणतात, ”मी आधीपासूनच सांगत आलो आहे, हे आम्ही करत नसून स्वामीच त्यांच्या भक्तांकडून हे सगळं घडवून आणत आहेत. आज अमेय खोपकर आमच्या मदतीला धावून आले आहेत. आमच्या या कठीण प्रसंगी ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या प्रकरणात जातीने लक्ष घालत आहेत. यासाठी मी अमेय खोपकर यांचे मनापासून आभार मानतो. प्रेक्षकांना ‘मी पाठीशी आहे’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.”
चित्रपटाचे निर्माते मयूर खरात म्हणतात, ” ज्यावेळी आम्ही चित्रपटाची निर्मिती करतो त्यावेळी आमची काही गणिते असतात. आज सेन्सॉर बोर्डच्या विलंबामुळे अनेक समस्यांचा आम्हाला सामना करावा लागत आहे. आणि हे नुकसान केवळ आर्थिक नसून मानसिकही आहे. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सर्टिफिकेटसाठी मागे लागलो होतो. आमची सगळी कागदपत्रे बरोबर आहेत. तसेच चित्रपटात कोणताही कट नसताना स्टाफने सहकार्य केले नाही. त्यामुळे प्रदर्शनासाठी विलंब होत आहे. मात्र, या सगळ्यात आम्हाला आता अमेय खोपकर सरांचे सहकार्य लाभले, यासाठी मी त्यांना धन्यवाद देईन. मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डची आता नितांत गरज आहे.”
ऑफबीट प्रॉडक्शन आणि वेरा प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे कथा, संकलन आणि दिग्दर्शन पराग अनिल सावंत यांनी केले असून मयूर अर्जुन खरात, ॲड. शुभांगी किशोर सोनवले, प्रमोद नंदकुमार मांडरे, शितल सोनावणे, ऋतुजा नरेंद्र कदम, अनिल गावंड आणि केतन कल्याणकर या स्वामींच्या सेवेकरांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. संजय नवगिरे, दिलीप परांजपे यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असून संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत. तर चित्रपटातील गाण्यांना कबीर शाक्य यांना संगीत सेवा करण्याची संधी लाभली आहे. या चित्रपटात सक्षम कुलकर्णी, सतीश पुळेकर, अरुण नलावडे, सुहास परांजपे, वर्षा प्रभु, श्रीकांत पाटील, अश्विनी चवरे, प्रसाद सुर्वे, शितल सोनावणे, सूचित जाधव, श्रद्धा महाजन, राजवीर गायकवाड, वैष्णवी पोटे यांच्या प्रमुख भूमिका असून माधुरी पवार, संदेश जाधव आणि नूतन जयंत हे विशेष पाहुणे म्हणून झळकणार आहेत.