छ. संभाजीनगर , 10 मार्च (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर मध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये कन्नड पिशोर रस्त्यावर ऊसाचा ट्रक उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात उसाच्या ट्रक खाली १७ मजूर दबले गेले आहेत.या घटनेत ६ जणांचा मृत्यू झालाय, तर ११ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.हा अपघात घटना रविवारी(दि. ९) रात्री उशीरा घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उसाने भरलेल्या ट्रकवर १७ मजूर बसून जात असताना अचानक ट्रक पलटी झाला आणि त्यामूळे मजूर उसाखाली दबले गेले. अपघाताची माहिती समजताच तेथील उपस्थित लोकांनी या मजुरांना बाहेर काढत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. या अपघातात ४ मजुरांचा मृत्यू झाला आहे.तर १३ जण जखमी झाले.जखमींना रुग्णलयात दाखल केले असता उपचारादरम्यान दोन मजूरांचा मृत्यू झाला. किसन धन्नू राठोड, मनोज नामदेव चव्हाण, विनोद नामदेव चव्हाण, मिथुन महारू चव्हाण, कृष्णा मुलचंद राठोड व ज्ञानेश्वर देविदास चव्हाण असे मृत्यू झालेल्या व्यक्तिचे नावं आहेत. तर ११ मजुरांना वाचवण्यात यश आले असून सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या अपघाताची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले.मात्र ही घटना नेमकी कशी आणि कुणाच्या चुकीमुळे झाली याचा तपास पोलीस करत आहे.