सातारा , 4 एप्रिल (हिं.स.)।गेल्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानजनक वक्तव्य केल्याची प्रकरणे समोर आली होती. यावर आता कायदा होणार असल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली. या कायद्याची घोषणा स्वत: केंद्रीय मंत्री अमित शाह रायगडावरुन येऊन करणार असल्याची माहिती खासदार भोसले यांनी दिली. काही दिवसापूर्वी अमित शाह यांची भेट घेऊन या कायद्याची मागणी खासदार भोसले यांनी केली होती. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, या महिन्यात 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून घोषणा होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात मी जी इच्छा व्यक्त केली होती, त्या कायद्याची घोषणा झाली तर याला वेगळे महत्व प्राप्त होईल, असंही उदयनराजे भोसले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत प्रशांत कोरटकर यांनी विधान केले होते.या प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.
महापुरुषांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणे, या प्रकरणातील नागपुरातील आरोपी प्रशांत कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांनी गुरुवारी(दि.२) जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अपील अर्ज केला. यावर उद्या, शनिवारी(दि. ५)किंवा सोमवारी(दि. ७) दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. चौथे सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांनी मंगळवारी(दि. १) कोरटकर याचा जामीन अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे कोरटकर याचा मुक्काम कळंबा कारागृहात वाढला आहे. नवीन अर्जावर सरकारी वकील, पोलिस विभागातील तपास अधिकारी, फिर्यादी इंद्रजित सावंत यांचे म्हणणे घेतले जाणार आहे. त्यानंतर जामीनवर निर्णय होणार आहे. –