महादेव बेटिंग ऍप प्रकरणी उचलला कारवाईचा बडगा
रायपूर, 26 मार्च (हिं.स.) : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज, बुधवारी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरी छापा टाकला. महादेव बेटिंग ऍप प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. यासंदर्भात स्वतः भूपेश बघेल यांनी ट्विटरच्या (एक्स) माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली.
महादेव ऑनलाइन बेटिंग ऍप प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून आतापर्यंत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 2295 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त तसेच गोठवली आहे. एका मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने 10 मार्च रोजी दुर्ग जिल्ह्यातील 14 ठिकाणी छापेमारी केल्यानंतर काही दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले. ज्यात भूपेश बघेल आणि त्यांचा मुलगा चैतन्य बघेल यांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी देखील बघेल यांनी एक्सवर पोस्ट करत ईडीला त्याच्या निवासस्थानी 33 लाख रुपयांची रोख सापडल्याचे नमूद केले होते. ही रक्कम शेती, दुग्धव्यवसाय यातून मिळालेले उत्पन्न आणि कौटुंबातील लोकांच्या बचतीतून जमा केली होती, असे त्यांनी म्हंटले होते.
महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळा हा छत्तीसगडमधील भिलाई येथील व्यक्तींचा समावेश असलेल्या आणि यूएई तसेच भारतातील विविध राज्यांमधून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कारवायांचे एक नेटवर्क आहे. छत्तीसगड येथे 2023 मध्ये अनेक छामेमारीच्या कारवाईदरम्यान ईडीने या घोटाळ्याचा भंडाफोड केला होता. ईडीच्या माहितीनुसार, महादेव ऑनलाइन बेटिंग ऍप हा एक अनधिकृत प्लॅटफॉर्म होता. ज्या माध्यमातून क्रिकेट आणि फुटबॉलसह विविध खेळांवर तसेच जुगाराच्या इतर प्रकारांवर बेकायदेशीर बेटिंगचा व्यवहार चालवला होता. संपूर्ण भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या ऍपने झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून अनेकांना आकर्षिक केले होते.
—————————-