रायपूर , 2 एप्रिल (हिं.स.)।छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश सिंह बघेल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ६००० कोटी रुपयांच्या महादेव ॲप ऑनलाईन बेटिंग घोटाळा प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने भूपेश बघेल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
तब्बल ६००० कोटी रुपयांच्या महादेव ऑनलाईन बेटिंग ऍप घोटाळा प्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, महादेव ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्यासह २१ जणांविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच असीम दास, सतीश चंद्राकर, चंद्रभूषण वर्मा यांच्यासह अनेक नावांचा एफआयआरमध्ये समावेश आहे. भूपेश बघेल यांच्या कार्यकाळात महादेव ॲपला संरक्षण देण्यात आल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपयांचे संरक्षण पैसे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तथापि, भूपेश बघेल यांनी हा दावा फेटाळून लावला आणि म्हटले की, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे केले गेले आहे. महादेव बेटिंग ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आहेत आणि ते भिलाई, दुर्गचे रहिवासी आहेत. सौरभ चंद्राकर सध्या दुबईत आहेत.
मार्च महिन्यात सीबीआयने छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई केली होती. सीबीआयने भूपेश बघेलसह देशभरातील सर्व आरोपींच्या ६० ठिकाणी छापे टाकले होते. ज्या दिवशी भूपेश बघेल यांच्या घरावर छापा टाकण्यात आला, त्याच दिवशी भिलाईचे आमदार देवेंद्र यादव, अनेक राजकारणी, नोकरशहा आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. यानंतर आता महादेव ॲप ऑनलाईन बेटिंग घोटाळा प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने भूपेश बघेल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.