एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त कविता केल्याचे प्रकरण मुंबई , 24 मार्च (हिं.स.)।उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर टीका करणे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला आता चांगलेच भोवले आहे. कुणाल कामरा याने एक व्हिडिओ बनवून शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. याच प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल हे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. यासोबतच यावेळी शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुणाल कामराविरोधात रविवारी(दि. २३) रात्री अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि खार पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि डीसीपीकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. कामरा यांनी दोन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागितली नाही, तर तो जिथे दिसेल तिथे शिवसैनिक त्याचे तोंड काळे करतील. असा इशाराही मुरजी पटेल यांच्याकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसैनिकांनी खारच्या ‘द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेल’मध्ये असलेल्या कुणालच्या स्टुडिओमध्ये घुसून तोडफोड केला.
यानंतर आता शिवसेनेचे युवा सेना सरचिटणीस राहूल कनाल व बांद्रा विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना खार पोलीसांनी सर्व फौजफाटा सोबत नेऊन आज(दि. २४) पहाटे चार वाजता त्यांच्या घरी जाऊन ताब्यातघेतले आहे. कुणाल कामरा प्रकरणात या दोघांना खार पोलीस स्टेशनला नेलं असल्याचे कुणाल सरमळकर यांनी कळविले आहे. दरम्यान, वादग्रस्त टिकेनंतर कामरा मुंबईतून फरार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.कामरा रविवारी(दि. २३) रात्रीच मुंबई सोडून फरार झाला आहे.
सध्या तो कुठे आहे याबाबत खात्रीशीर माहिती नसली तरी पोलीस त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. शिवसैनिकांच्या आक्रमकतेमुळे त्याने आपली सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबईतून पलायन केल्याचं सांगितलं जातं. कुणाल कामराच्या गाण्यामुळे निर्माण झालेला तणाव वाढत चालला आहे. त्याच्याविरोधात राजकीय स्तरावरही संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे प्रकरण अधिक चिघळत आहे. यासर्व गोंधळानंतर कुणाल कामराने सोशल मीडियावर संविधान हातामध्ये घेऊन एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केलीये. —————