पुणे, 20 मार्च (हिं.स.)।
अत्यंत शांतप्रिय अशी ओळख असलेल्या राज्याच्या उपराधानीत घडलेली दगडफेकीची आणि जाळपोळीची घटना नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. या घटनेत काही समाजकंटकांनी पोलिसांवर थेट हल्ले केले, महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग केला आणि वाहनांची जाळपोळ करत शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. समाजातविघात, विखारी प्रदर्शन करणाऱ्या समाजकंटकांविरोधात बुलडोजर कारवाई करण्याची मागणी यानिमित्ताने इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी गुरूवारी (ता.२०) केली आहे. नागपूर येथे घडलेल्या घटनेचा पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
राज्यातील काही विरोधी शक्ती धार्मिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र रचत आहेत. पंरतु, राज्यात शांतता आणि सौहार्द कायम राहावा, यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. काही समाजविघातक प्रवृत्ती मात्र हेतुपुरस्सर हिंसक घटना घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत. नागपुरातील घटनेत पोलीस दलावर हल्ला होतो, महिला पोलिसांशी गैरवर्तन होते, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. या घटनेनंतर काही समाजकंटकांना अटक करण्यात आली आहे. पंरतु, केवळ अटक पुरेशी नाही. आरोपींच्या घरांवर बुलडोजर कारवाई करण्याची वेळ महाराष्ट्रातही आली असल्याचे पाटील म्हणाले.
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये हिंसाचार करणाऱ्यांवर सरकारने बुलडोझर कारवाई करून कठोर संदेश दिला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही अशा समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी हेमंत पाटील यांनी केली. हिंसाचार भडकवणाऱ्यांना वाचवले जाऊ नये. त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि हिंसाचार राज्यभर पसरू नये यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. “फडणवीस यांनी दाखवलेल्या कार्यकर्तृत्वाचे अभिनंदन. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे पाटील म्हणाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी महाल आणि परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. शहरात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांकडून पुढील काही दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परंतु, जे समाजकंटक कायदा हातात घेतात, त्यांना कठोर शासन होईल, हा संदेश सरकारने आणि प्रशासनाने बुलडोजर कारवाईच्या माध्यमातून द्यायला हवा, असेही मत पाटील यांनी व्यक्त केले.