चंदीगड, 12 मार्च (हिं.स.) : हरियाणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचाच वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील 10 पैकी 9 महापालिकांमध्ये भाजपचे महापौर विजयी झाले आहेत. तर मानेसर येथून डॉ. इंद्रजित यादव या अपक्ष उमेदवाराला विजयी मिळाला आहे. तर काँग्रेसचा एकही महापौर निवडून आलेला नाही.
प्रतिक्रिया देताना हरियाणा भाजप अध्यक्ष मोहनलाल बदौली म्हणाले की, या निवडणुकीच्या निकालातून असे अधोरेखित होते की, राज्यातील जनतेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास व्यक्त केला आहे. आता हरियाणामध्ये ट्रिपल इंजिन सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे राज्यात आता विकास तिप्पट होईल. तसेच काँग्रेसचा निवडणुकीतील दारुण पराभव पाहता असे दिसून येते की, राज्यात काँग्रेसची वाटचाल राजकीय अंताच्या दिशेने सुरू झाल्याचा टोला बदौली यांनी लगावला आहे.