नाशिक, 26 मार्च (हिं.स.)।
– भारतीय जनता पार्टी व महायुतीचे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष नसून केवळ आर्थिक स्वार्थासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाणून-बुजून होऊ देत नाही लोकशाही पद्धतीने निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांचे मित्र पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देत नाही परंतु काँग्रेस पक्ष यापुढे निवडणुका लवकर व्हाव्यात म्हणून राज्यात लवकरच आंदोलन उभे करेल असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे प्रभारी बीएम संदीप यांनी व्यक्त केले.
नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी बैठकीमध्ये त्यांनी मनोगत व्यक्त करत असताना विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरून कार्यकर्त्यांनी परत नव्याने मजबूत संघटना उभी करावी. भाजपा युतीला मिळालेले पाशवी बहुमत मतं चोरून मिळालेले आहे त्यामुळे सामान्य जनतेचे लक्ष आता काँग्रेस पक्षाच्या भूमिकेकडे आहे. यापुढे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मर्ग झटकून बूथ लेवल पासून तर जिल्हास्तरापर्यंत संघटना वाढीकडे लक्ष द्यावे आगामी काळ आपला असून जनतेच्या मनात काँग्रेस आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संदीप यांनी या बैठकीत व्यक्त केले.
जिल्ह्याचे प्रभारी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ब्रिज किशोर दत यांनी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार आगामी काळातील कार्यक्रम जिल्हा व शहर स्तरावर दिला जाईल. विधानसभा निवडणुकी त पक्षावर नाशिक जिल्ह्यात झालेला अन्याय दूर करून स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पक्षाला मानाचे स्थान मिळेल अशी मला खात्री आहे असे उद्गार बैठकीत काढले. नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी आपल्या प्रास्ताविकात शहर काँग्रेसच्या कार्याचा आढावा देत लवकरच प्रभाग निहाय बैठका सुरू करण्यात येणार आहे व स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लोकांपर्यंत जायला पाहिजे जिल्ह्यातला शेतकरी शेतमजूर कामगार सर्व घटकातील सामान्य माणूस हा महागाई ने त्रस्त आहे. ग्रामीण भागात काँग्रेस वाड्या पाड्या पर्यंत घेऊन जाऊ मग गतवैभव प्राप्त करू अशी अशा व्यक्त केली.
—————