अहिल्यानगर दि. 5 मार्च (हिं.स.) :- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ते पाहता हा खून अत्यंत निघृणपणे केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी केवळ धनंजय मुंडे यांच्या राजीनामा पुरेसा नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व अख्ख्ये राज्य मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सेक्रेटरी कॉ.सुभाष लांडे यांनी केली आहे. या बाबतीत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात ॲड. लांडे यांनी म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांचे या खून प्रकरणातील संबंध उघड झाले असताना,
त्यांचा राजीनामा घ्यायला 85 दिवस का लावले? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिले पाहिजे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून, पैशाचा वारेमाप वापर करून, गुंडांच्या मदतीने निवडून आलेल्या भाजपा-महायुतीच्या सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर राज्यात थैमान घातले आहे.परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस ठाण्यात मारहाण करून खून केला जातो. महापुरुषांची बदनामी व विटंबना केली जाते.इंद्रजित सावंत यांच्या सारख्या इतिहास अभ्यासकांना धमकावले जाते. तरी मुख्यमंत्री मख्खपणे राहत, काहीही बोलत नाहीत अथवा कारवाई करत नाहीत.
यात सत्ताधाऱ्यांचा आलेला सत्तेचा माज दिसून येतो.संतोष देशमुख यांच्या खुनानंतर आरोपींनी जे कृत्य केले, त्याचे फोटो बघून जनमानसात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. पण फडणवीस, शिंदे, पवार यांच्यासह मंत्रिमंडळ मात्र अतिशय असंवेदनशील असून, त्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी अनेक दिवस वाया घालवत, तो सन्मानपूर्वक शरण येण्याची वाट पाहत राहिले. इतकेच नव्हे, तर मुंडेचा राजीनामा घ्यायला तीन महिने लावले. एकूणच भाजपा सरकार संवैधानिक संस्थांचे अवमूल्यन करून, त्यांचा गैरवापर, असंवैधानिक पध्दतीने राज्य कारभार करत जातीधर्मांत तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसून, राज्यातील अख्खे मंत्रिमंडळ बरखास्त करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी केली आहे.–