भंडारा , 6 एप्रिल, (हिं.स.)। मागील अनेक दिवसापासून मानसिक त्रस्त असलेल्या एका शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरातील स्वयंपाक खोलीच्या लाकडी फाट्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्हातील लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी येथे घडली. हेमराज शंकर वाघ असे मृतकाचे नाव आहे. मृतक हेमराज वाघ यांचेकडे सव्वा एकर शेती आहे. मात्र गेल्या अनेक दिवसापासून तो मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता.
गेल्या काही दिवसापासून हेमराज हा मानसिक आजाराने त्रस्त होता. सकाळी पतीपत्नी दोघेही सोबतच होते.मात्र काही वेळासाठी पत्नी घराबाहेर गेल्याची संधी साधून हेमराज ने आपल्या घराच्या स्वयंपाक खोलीतील लाकडी फाट्याला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली.
हेमराजची पत्नी बाहेरून येताच तिला गळफास घेतलेला दिसताच तिने आरडाओरड केली.आत्महत्या केल्याची माहिती गावात पसरताच मोठ्या संख्येने महिला पुरुषांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शव विच्छेदनासाठी लाखांदूर येथे पाठविले.