अमरावती, 14 मार्च (हिं.स.) अमरावती (बेलोरा) विमानतळाला गुगलने डॉ. पंजाबराव देशमुख एअरपोर्ट अमरावती असे नाव दिल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हवाई प्रवासासाठी सज्ज झालेले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने १९९२ मध्ये या विमानतळाची धावपट्टी तयार केली होती. तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजेच तब्बल ३३ वर्षांपासून या विमानतळावर केवळ व्हीव्हीआयपींची चार्टर्ड विमाने उतरत होती. प्रवासी वाहतुकीसाठी मोठी विमाने उतारण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढविणे गरजेचे होते. २००९ पासून हा मार्ग आता प्रशस्त झालेला आहे. अमरावती विमानतळावरून या महिन्याच्या अखेरीस विमान उडण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
मात्र त्यासोबतच विमानतळाच्या नामकरणाचा वाद रंगू लागला आहे. सरकारने या विमानतळाला प्रज्ञाचक्षु ज्ञानेशकन्या गुलाब महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याच्या वार्तेने हा वाद समोर येऊ लागला आहे. या विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळ, असे नाव यापूर्वी देण्यात आलेले होते, असे सांगितले जात आहे. त्यासंबंधीचे दाखले दिले जात आहे. त्याला गुगलने बळकटी दिलेली आहे. गुगल मॅपवर विमानतळाचा उल्लेख डॉ. पंजाबराव देशमुख एअरपोर्ट असा आहे. ज्याअर्थी गुगलने विमानतळाला नाव दिलेले आहे, याचा अर्थ सरकारने विमानतळाच्या नामकरणाचा घोळ घातल्याचे स्पष्ट होत आहे.