बीड, 31 मार्च (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात रविवारी(दि. ३०) रात्री अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. आता प्रकरणी पोलिसांनी दोन संशयीत आरोपींना अटक केली आहे. आरोपींना विशेष कोर्टात हजर केले असता दोघांना 3 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अर्धमसला गावातील मशिद ब्लाट प्रकरणात आता एटीएस या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे जिलेटिन वापरऱ्याचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले आहे. आरोपींनी स्फोट घडवून आणण्यासाठी जिलेटिन कुठून आणले. या स्फोटामागे नेमका कोणाचा हात आहे, याबाबत एटीएसचे अधिकार कसून चौकशी करत आहेत. विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे असे या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही आरोपी अर्धमसला गावातील रहिवासी आहेत.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे मशिदीत जिलेटिनच्या कांड्या ठेवून स्फोट घडवून आणला होता.या घटनेनंतर अज्ञात माथेफिरू फरार झाले होते. या भयानक स्फोटात मशिदीतील फरशी फुटली तसेच भिंतीला भेगा पडल्या होत्या. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळी पोलीस दलाचे बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमही दाखल झाली होते.या दरम्यान, पोलिसांनी स्फोट प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेतले असून पोलिस कसून चौकशी करत आहे.