मुंबई, 23 मार्च, (हिं.स.)। व्यावसायिक वाहनांची आघाडीची उत्पादक आणि हिंदुजा समुहातील एक प्रमुख उद्योग असलेल्या अशोक लेलँड कंपनीने आंध्र प्रदेशातील विजयवाडाजवळ बस उत्पादनाचा एक नवीन कारखाना सुरू केला आहे. आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन आणि मनुष्यबळ या खात्यांचे मंत्री नारा लोकेश यांच्या हस्ते या कारखान्याचे उद्घाटन आज करण्यात आले.
या उद्घाटन समारंभाचा एक भाग म्हणून, अशोक लेलँड आणि हिंदुजा समूहाने “स्विच” इलेक्ट्रिक डबल-डेकर बसची चावी आंध्र प्रदेश सरकारकडे सुपूर्द केली. शाश्वत स्वरुपाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आपली कटिबद्धता दर्शवीत नारा लोकेश यांनी ही चावी सरकारच्या वतीने स्वीकारली. आंध्र प्रदेशचे वाहतूक, क्रीडा व युवक व्यवहार मंत्री एम. राम प्रसाद रेड्डी, उद्योग मंत्री टी. जी. भारत, कृष्णा जिल्ह्याचे खासदार व्ही. बालाशौरी, गन्नावरम येथील आमदार वाय. वेंकटराव, हिंदुजा समुहाचे भारतातील अध्यक्ष अशोक पी. हिंदुजा, हिंदुजा समुहातील पर्यायी ऊर्जा व शाश्वतता या विभागाचे प्रमुख शोम अशोक हिंदुजा आणि कंपनीचे अनेक वितरक, ग्राहक, पुरवठादार आदी या समारंभास उपस्थित होते.
विजयवाडापासून ४० किमी अंतरावर मलवल्ली येथे वसलेला हा आधुनिक प्रकल्प ७५ एकर क्षेत्रावर विस्तारलेला आहे. येथे अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचा समावेश करून जागतिक दर्जाच्या गुणवत्ता मानकांची पूर्तता करण्यात येणार आहे. या प्रकल्पात अशोक लेलँडच्या डिझेल बस आणि स्विच मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक बस यांचे उत्पादन होणार आहे. वार्षिक ४,८०० इतक्या बस उत्पादनाची क्षमता असलेल्या या कारखान्यात ‘नालंदा’ नावाचे आधुनिक शिक्षण केंद्र आणि प्रगत सेवा प्रशिक्षण केंद्रदेखील असेल. नव्याने सुरू झालेला हा प्रकल्प स्थानिक रोजगार आणि कौशल्य विकासाला मोठा हातभार लावेल. रूफटॉप सोलर पॅनेल्स, एलईडी प्रकाश व्यवस्था, संयंत्रातील वाहतुकीसाठी बॅटरी-चालित वाहने, पाण्याचा संतुलित वापर आणि झिरो-डिस्चार्ज प्रणाली अशा पर्यावरणपूरक सुविधा असणारा हा प्रकल्प ‘ग्रीन फॅक्टरी’ संकल्पनेनुसार उभारण्यात आला आहे.
या प्रसंगी नारा लोकेश म्हणाले, “हा आंध्र प्रदेशसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. या राज्यातील वाढत्या औद्योगिक क्षेत्रात अशोक लेलँडचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. हा प्रकल्प आंध्र प्रदेशला उत्पादन क्षेत्रात आघाडीवर आणण्यास मदत करेल आणि रोजगार निर्मिती, कौशल्य विकास या बाबतीत राज्याच्या अर्थव्यवस्थेस चालना देईल.”
अशोक लेलँडचे अध्यक्ष धीरज जी. हिंदुजा म्हणाले, “मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या प्रगत औद्योगिक धोरणाने प्रेरित होऊन आम्ही आंध्र प्रदेशमध्ये स्थायिक झालो आहोत. गेल्या अनेक दशकांपासून अशोक लेलँड व हिंदुजा समूह आंध्र प्रदेशशी जोडले गेले आहेत. आमच्या नवीन प्रकल्पाच्या उद्घाटनाने या गतिमान राज्यातील अशोक लेलँडसाठी आणखी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि प्रदेशाची समृद्धी वाढवण्यासाठी अधिक संधी शोधणार आहोत.”
अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेनू अग्रवाल म्हणाले, “या नवीन प्रकल्पामुळे भारतातील अव्वल क्रमांकाचा बस ब्रँड म्हणून आमची भूमिका अधिक मजबूत होईल आणि आम्ही जागतिक पातळीवरील अव्वल ५ बस उत्पादकांमध्ये स्थान मिळवू. भारतात पूर्णतः तयार बस निर्मितीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प मदत करेल. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर ऑर्डर असल्यामुळे पहिल्या दिवसापासून हा प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने कार्यरत असेल. अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि उच्च ऑटोमेशन यांतून आम्ही सर्वोच्च गुणवत्ता मानकांचे पालन करू.”