अमरावती, 18 मार्च (हिं.स.)।
संघटन कौशल्य, नेतृत्व क्षमता, व्यवस्थापन, सर्व पक्षांमध्ये जनसंपर्क व समन्वय…, दुरदृष्टी,विकासात्मक व्हिजन… त्यात आणखी भर म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य व किंग मेकर म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके आता आमदार होण्याचा मार्ग मोकळा झालाय. गेल्या ३५ वर्षापासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवारयांच्यासोबत असलेल्या निष्ठेचे फळत्यांना मिळाले आणि जिल्ह्याला १२ वा आमदार मिळाला. राकाँच्या वाट्याला महायुतीमधून एक आमदार आल्यानंतर या आमदारकीवर अनेकांचे डोळे असताना दादांनी संजय खोडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, यावरून खोडकेंची पक्षात असलेली छाप वेगळी सांगायला नको. त्यामुळे आता संजय खोडके यांना मिळणार असलेल्या जबाबदारीनंतर अमरावतीकरांना आता राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची आस आणि विकासात्मक दृष्टीकोनातून आशा अपेक्षा वाढलेल्या आहेत.
जिल्ह्यात आता ३ खासदार आहेत. अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार बळवंत वानखडे तर राज्यसभेवरील खा. डॉ. अनिल बोंडे… तसेच जिल्ह्यातील नांदगाव खंडे, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि वरुड तालुके वर्धा लोकसभा मतदार संघात असल्याने वर्धा लोकसभा मतदार संघाचे खा. अमर काळे… असे एकूण तीन खासदार आहे. भविष्यात आणखी एखादा राज्यसभा खासदार जिल्ह्याला मिळण्याची आशा आहे. सोबत आठ विधानसभा मतदार संघात अमरावती – सुलभा खोडके, बडनेरा- रवि राणा, धामणगाव -प्रताप अडसड, तिवसा- राजेश वानखडे, मोर्शी- उमेश यावलकर, अचलपूर – प्रवीण तायडे, दर्यापूर- गजानन लवटे आणि मेळघाट केवलराम काळे असे एकूण आठ आमदार आहे.
सोबतच शिक्षक मतदार संघातून किरण सरनाईक, शिक्षक पदवीधर मतदार संघातून धिरज लिंगाडे तर मुळचे अमरावतीचे असलेले श्रीकांत भारतीयहे तीन आमदार विधानपरीषदेवर आहेत. एक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक न झाल्यामुळे प्रवीण पोटे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील आमदारकीचे पद रक्त आहे.
त्यात आता महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या गुरुवार २७ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने संजय खोडके यांना एकमताने अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस ार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी याबाबत अधिकृत घोषणा कल्या नंतर त्यांनी सोमवार १७ मार्च रोजी संजय खोडके आपला मेदवारी अर्ज दाखल केला आणि एकमेव असल्यामुळे संजय खोडके यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला.
अमरावतीकरांच्या आशा-अपेक्षा वाढल्या
संजय खोडके यांच्या रुपाने आता अमरावतीला १२ वा आमदार मिळणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून ११ आमदार, तीन खासदार असताना ना जिल्ह्याला केंद्रात वा राज्यात साधे मंत्रिपद मिळाले नाही. पालकमंत्री सुद्धा जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यामुळे आता १२ आमदार झाल्यानंतर तरी अमरावती जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी आशा अपेक्षा अमरावतीकरांना लागलेली आहे.
एकाच घरात दोन आमदार
यापूर्वी अमरावतीत माजी खासदार नवनित राणा, तर आमदार म्हणून रवि राणा विधानसभेवर होते. आता त्यानंतर अमरावतीच्या आमदार म्हणून सुलभा खोडके यांच्यानंतर त्यांचे पती संजय खोडके यांचा विधान परीषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आता एकाचघरात दोन आमदार राहणार आहेत. संजय खोडके हे विदर्भातील पक्षाचे मोठे नेते असून ते आमदार सुलभा खोडके यांचे पती आहे. त्यामुळे आगामी काळात विधान भवनात पती-पत्नी आमदार पाहायला मिळणार आहेत.