आग्रा , 6 एप्रिल (हिं.स.)।आग्रामध्ये शनिवारी (दि.५) पॅराशूट न उघडल्याने हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.आग्रा येथे “डेमो ड्रॉप” दरम्यान झालेल्या दुखापतींमुळे भारतीय हवाई दलाच्या आकाश स्कायडायव्हिंग टीमच्या पॅरा जंप प्रशिक्षकाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉरंट ऑफिसर रामकुमार तिवारी (४१) यांनी सकाळी ९.३० वाजता हेलिकॉप्टरमधून उडी मारली, परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे पॅराशूट वेळेवर उघडले नाही, ज्यामुळे ते थेट जमिनीवर पडले. यानंतर त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच रुग्णालयात अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
यानंतर भारतीय हवामान खात्याने त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर ट्वीट करत या घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलिस आयुक्त विनायक भोसले म्हणाले, ‘दुपारी १२ वाजता लष्करी रुग्णालयातून मृत्यूची माहिती मिळाली. सदर पोलिस ठाण्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
हवाई दलाने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आज आग्रा येथे डेमो ड्रॉप दरम्यान झालेल्या दुखापतींमुळे आयएएफच्या आकाश गंगा स्कायडायव्हिंग टीमच्या पॅरा जंप प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. हवाई दल या नुकसानाबद्दल मनापासून शोक व्यक्त करते आणि शोकग्रस्त कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करते आणि या दुःखाच्या वेळी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहे.
दरम्यान, सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गुजरातमधील जामनगरमध्ये लढाऊ विमानाच्या अपघातात फ्लाइट लेफ्टनंटचा मृत्यू आणि आता आग्रामध्ये पॅराशूट न उघडल्याने हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी खूप दुःखद आहे.”ते पुढे म्हणाले, “सुरक्षेशी तडजोड करणे घातक ठरते. अशा प्रकरणांमध्ये, प्रत्येक स्तरावर गुणवत्तेची सखोल आणि गंभीर चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे अपघात पुन्हा होणार नाहीत. श्रद्धांजली!”
बुधवारी गुजरातमधील जामनगरमध्ये हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान प्रशिक्षण उड्डाणादरम्यान कोसळले. या अपघातात पायलट सिद्धार्थ यादव शहीद झाले. अपघातापूर्वी, त्याने त्याच्या सोबत्याला सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी वेळ दिला आणि विमान दाट लोकवस्तीच्या क्षेत्रापासून दूर नेले, ज्यामुळे अनेकांचे जीव वाचले.
—————