कोलकाता , 17 मार्च (हिं.स.)।आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी-20 चा अंतिम सामना भारत व वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान रायपुरच्या मैदानावर रविवारी (दि. १६) झाला. ज्यात भारताने वेस्टइंडिजविरूद्ध दणदणीत विजय मिळवला. विनय कुमारच्या ३ विकेट्सच्या मदतीने भारताने विजयासाठी १४८ धावांचे सोपे लक्ष्य उभारले. पण रायडूची तुफानी खेळी अन् सलामीवीरांच्या अर्धशतकी भागीदारीसह भारताने लक्ष्य सहज पार केले व १८ व्या षटकात विजय खेचून आणला.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण वेस्टइंडिज संघ प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. सलामीवीर ड्वेन स्मिथने चांगली सुरूवात केली. पण आघाडीच्या दोन विकेट्स स्वस्तात गेल्या. कर्णधार ब्रायन लारा आणि विल्यम पर्किन्स यांनी प्रत्येकी ६ धावा केल्या. त्यानंतर लेंडल सिमन्सने चांगली फटकेबाजी केली.
ड्वेन स्मिथचे अर्धशतक ५ धावांनी हुकले, त्याला शाहबाझ नदीमने ४५ धावांवर रोखले. तर लेंडल सिमन्सने मात्र अर्धशतकी कामगिरी केली, त्याने ५ षटकार व १ चौकारासह ४१ चेंडूत ५७ धावा कुटल्या. त्यानंतर विंडीजचा डाव पुन्हा घसरला. वेगवान गोलंदाज विनय कुमारने सामन्यात ३ विकेट्स घेतल्या, तर शाहबाझ नदीमने २ विकेट्स मिळवल्या. पवन नेगी अन् स्टुअर्ट बिनी यांना प्रत्येकी एक विकेट घेता आली. विंडीजने २० षटकांअंती ७ बाद १४८ धावा उभारल्या.
भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग सहज करू शकला. सलामीवीर अंबाती रायडू व कर्णधार सचिन तेंडुलकर यांनी एकूण ६७ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघावरचा दबाव खूपच कमी झाला. सचिन १८ चेंडूत २५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर गुरप्रीत सिंग मानने १४ घावा केल्या. अंबाती राडूने मात्र अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकले. त्याने ९ चौकार अन् ३ षटकारांच्या मदतीने ५० चेंडूत ७४ धावांची खेळी केली. त्यामुळे पुढील फलंदाजांचे काम सोपे झाले.युवराज सिंगने १३ व स्टुअर्ट बीनीने नाबाद १६ धावांची खेळी केली अन् भारताने अंतिम सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारताच्या मास्टर्स संघाने मास्टर्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले.