जळगाव, 6 मार्च (हिं.स.) : अमळनेर तालुक्यातील बहादरवाडी फाट्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. यात सुमारे ९ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध वाळू वाहतुकीच्या वाढत्या तक्रारीनंतर परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बहादरवाडी फाट्यावर सापळा रचून रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.
ट्रॅक्टर (एमएच १९ एएन ४४६०) – चालक रवींद्र बुवानी भौल (वय ३०, रा. रुबनी नगर) ट्रॅक्टर (एमएच १९ बीजी ७०२९) – चालक अर्जुन शिवा पवार (वय २६, रा. हिंगोणा) विना क्रमांकाचे लाल रंगाचे ट्रॅक्टर व निळ्या रंगाची ट्रॉली – चालक किशोर शांताराम पाटील (वय २६, रा. हिंगोणा) तीन्ही ट्रॅक्टरसह ९ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल म्हस्के यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी सांगितले की, तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक तसेच इतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अवैध उत्खननाला साथ देणाऱ्या मालकांचाही शोध घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.