जळगाव, 12 एप्रिल (हिं.स.) जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रचंड घटना उघड होत आहेत. जळगाव शहर पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले दोघे पोलिस हवालदार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. हे.कॉ. रविंद्र प्रभाकर सोनार आणि धनराज निकुंभ अशी दोघांची नावे आहेत. जळगाव एसीबी पथकाने शुक्रवारी 11 एप्रिलच्या रात्री ही कारवाई केली. जळगाव शहर पोलिस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध कलम 7,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील तक्रारदार हे केंद्रीय अर्ध सैनिक बल मध्ये कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे त्यांच्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद झाले होते. या वादातून तक्रारदाराच्या पत्नीने त्यांच्या पतीविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला 4 एप्रील रोजी फिर्याद दाखल केली होती. त्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या चौकशीकामी हे.कॉ. रविंद्र प्रभाकर सोनार यांनी तक्रारदार पतीला चौकशीकामी जळगाव शहर पोलिस स्टेशनला बोलावले होते. पोलिस स्टेशनला आल्यानंतर रविंद्र सोनार यांनी त्यांची हे.कॉ. धनराज निकुंभ यांच्यासोबत भेट घडवली. या गुन्ह्याच्या तपासकामी अटक टाळण्यासह मदत करण्याकामी आणि वरिष्ठ अधिका-यांना अहवाल न पाठवण्यासाठी सोनार यांनी स्वत:साठी निकुंभ यांच्याकडून पन्नास हजार रुपयांची मागणी केली.
निकुंभ यांचा तगादा आणि अगोदरच पत्नीने पोलिस स्टेशनला दिलेली फिर्याद यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीच्या पडताळनीत तडजोडीअंती विस हजार रुपये देण्या घेण्याचे आढळले. एसीबी पथकाने सापळा रचला. सापळ्या दरम्यान रविंद्र सोनार यांनी पंचासमक्ष विस हजार रुपयांची लाच स्विकारली. रविंद्र सोनार यांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले असून दोघांविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव एसीबीचे पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस अप अधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, सापळा पथकातील पोउपनिरी सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोहेकॉ जनार्दन चौधरी, पोहेकॉ सुनिल वानखेडे, पोना बाळू मराठे, पो. कॉ राकेश दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला
—————