नाशिक, 28 मार्च (हिं.स.)। मनसेचा गुढीपाडवा मेळावा रविवारी ३० मार्च रोजी होणार असून हा मेळावा संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा लक्ष वेधणारा आहे. मनसेच्या मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यासाठी रविवारी नाशिक जिल्ह्यातून १ हजार वाहनांचा ताफा जाणार असून सुमारे १० हजार कार्यकर्ते आपल्या नाशिक जिल्ह्यातून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील , प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम , प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख , जिल्हाध्यक्ष अंकुश पवार , शहराध्यक्ष सुदाम कोंबडे , महिला प्रदेश अध्यक्ष सुजाता डेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की , प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम , प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख , जिल्हाध्यक्ष अंकुश पवार , शहराध्यक्ष सुदाम कोंबडे महिला प्रदेश अध्यक्ष सुजाता डेरे यांनी जिल्ह्यातील पंधराही तालुक्यात तसेच शहरातील पंचवटी , नाशिकरोड , मध्य नाशिक , सातपूर , सिडको येथे दौरे केले. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्यात आले . तसेच पदाधिकाऱ्यांच्या व नागरिकांच्या समस्या समजावून घेण्यात आल्या.
या झालेल्या दौऱ्या नुसार जिल्ह्यातील व शहरातील समस्यांवर येत्या ३० मार्च नंतर मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण तयार झालेले आहे. संपूर्ण जिल्हा व शहर मधून सुमारे दहा हजार पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी जाणार आहेत. यासाठी जिल्हा व शहर मधून सुमारे १ हजार वाहनांचा ताफा निघणार आहे. यामध्ये बसेस चार चाकी आहे. काही पदाधिकारी व कार्यकर्ते रेल्वेने देखील जाणार आहेत अत्यंत उत्साहात पदाधिकारी व कार्यकर्ते ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक येथून निघणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.