Earthquake: दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी 2.30 वाजता भूकंपाचे (Earthquake in Delhi NCR) धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवत होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.8 इतकी मोजली गेली आहे. हा भूकंप केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नाही तर उत्तराखंड, यूपीमधील रामपूरमध्येही जाणवला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता.
नेपाळमध्ये दुपारी 2.28 वाजता 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, जो दिल्ली-एनसीआर, उत्तराखंड आणि यूपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जाणवला. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले.
नवीन वर्षात दिल्लीत तीन वेळा भूकंपाचे धक्के
नवीन वर्षात दिल्लीत आतापर्यंत तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी, दिल्ली-एनसीआरमधील लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात भूकंपाच्या धक्क्यांनी झाली. त्यानंतर ५ जानेवारीलाही भूकंपाचे धक्के जाणवले होते.
मंगळवारी दिल्ली एनसीआर व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भुकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरले आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली.
An earthquake with a magnitude of 5.8 on the Richter Scale hit Nepal at 2:28 pm today: National Center for Seismology (NCS) pic.twitter.com/bAyESuuQFJ
— ANI (@ANI) January 24, 2023
जयपूरलाही जाणवले धक्के
राजस्थानची राजधानी जयपूरच्या काही भागात मंगळवारीही भूकंपाचे धक्के जाणवले. हवामान खात्याने याबाबत माहिती दिली. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे विभागाने सांगितले.
भूकंप कसे होतात?
भूकंप होण्याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीच्या आतील प्लेट्स एकमेकांवर धडकणे. पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. जेव्हा या प्लेट्स कधीतरी आदळतात तेव्हा तेथे फॉल्ट लाइन झोन तयार होतो आणि पृष्ठभागाचे कोपरे दुमडलेले असतात. पृष्ठभागाच्या कोपऱ्यामुळे, तेथे दाब तयार होतो आणि प्लेट्स तुटू लागतात. या प्लेट्स तुटल्यामुळे आतील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते, ज्यामुळे पृथ्वी हादरते. याच घटनेला भूकंप म्हणतात.