Pathaan Record: वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पठाण चित्रपट (Pathaan Movie) सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने शाहरुख खान (Shahrukh Khan) चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. अशात पठाण हा परदेशात प्रदर्शित होणारा सर्वात मोठा भारतीय चित्रपट ठरला आहे. यशराज फिल्म्सने हा चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये रिलीज करण्याची योजना राबवली आहे. परदेशात 2500 हून अधिक स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतीय चित्रपटाला आतापर्यंत परदेशात मिळालेली ही सर्वाधिक स्क्रीन आहे.

25 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या पठाणची अॅडव्हान्स बुकिंगला तेलुगू आणि तमिळमध्येही वेग आला आहे. चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगची कमाई 24 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. देशात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये पठाण चित्रपटाने आगाऊ बुकिंग दरम्यान तिकीट विक्रीचा विक्रम केला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत 8,05,915 तिकिटे विकली गेली आहेत.
याआधी ‘बाहुबली 2’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर होता, ज्याने रिलीजपूर्वी 6.50 लाख तिकिटांची विक्री केली होती. गेल्या शनिवारपासून चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने वेग घेतला असून तिकीट विक्रीतून 24 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट धमाकेदार ओपनिंग करेल असा विश्वास आहे. चित्रपटाची ओपनिंग 40 ते 50 कोटींच्या दरम्यान होणार असा अंदाज आहे.
आत्तापर्यंत, देशात हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा विक्रम ‘KGF 2’ या चित्रपटाच्या नावावर आहे, ज्याने गेल्या वर्षी 53.95 कोटी रुपयांची शानदार ओपनिंग घेतली होती. हिंदीत बनलेल्या चित्रपटांमध्ये हा विक्रम ‘वार’ चित्रपटाच्या नावावर आहे, ज्याने 53.35 कोटींची ओपनिंग केली होती. तर ‘संजू’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 34.19 कोटींची कमाई केली होती. पठाण चित्रपटाची आगाऊ बुकिंग पाहता हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी 41 कोटींच्या जवळपास ओपनिंग घेईल असा अंदाज आहे.