मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची आज सोडत !
कुणाची लागणार लॉटरी ?
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १७ प्रभागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह सभागृहात काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती (महिला व पुरुष), अनुसूचित जमाती (महिला व पुरुष), नागरिकांचा मागासवर्ग (महिला व पुरुष) आणि सर्वसाधारण पुरुष व महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यामुळे शहरातील राजकीय घडामोडींना अधिक वेग येणार आहे.
आरक्षण सोडतीसाठी नगरपरिषदेने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बुधवार, ८ ऑक्टोबरला प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात येईल. त्यानंतर गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी आरक्षणाचा तपशील प्रसिद्ध केला जाणार आहे. या प्रसिद्धीनंतर नागरिक, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून हरकती व सूचना मांडण्यासाठी ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संधी दिली जाणार आहे. हरकती व सूचना दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करता येणार असून, त्या संबंधित प्रभाग कार्यालय किंवा निवडणूक कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांकडे दिल्या जाऊ शकतात.
हरकती व सूचना नोंदवणाऱ्या नागरिकांना आवश्यक असल्यास सुनावणीसाठी स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, अशी माहिती नगरपरिषदचे मुख्याधिकारी सुभाष जानोरे यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे कोणत्या प्रभागात कोणता प्रवर्ग आरक्षित होणार, हे स्पष्ट होईल. यामुळे अनेक इच्छुक उमेदवार आणि राजकीय गट आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात करतील.
विशेषतः महिलांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागांवर सर्वांचे लक्ष असून, आरक्षणानुसारच निवडणुकीतील उमेदवारी निश्चित होणार आहे. या प्रक्रियेनंतर नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू होईल. त्यामुळे प्रभाग आरक्षण सोडत ही निवडणुकीतील पहिला महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.