राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे मुक्ताईनगरमध्ये भव्य पथसंचलन
व्हिडीओ बातमी पहा आपल्या मुक्ताई वार्ता फेसबुक पेज वर
मुक्ताईनगर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुक्ताईनगर शहरात स्वयंसेवकांचे भव्य पथसंचलन रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाले. संघाचे शताब्दी वर्ष विजयादशमीपासून सुरू झाले आहे. या पथसंचलनासोबतच तालुक्यात ८२ गावांमध्ये संपर्क अभियान राबवण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
पथसंचलन आणि नागरिकांचा प्रतिसाद
पथसंचलनाची सुरुवात संत गजानन महाराज मंदिर येथून होऊन ते तहसील रोड, पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर, नवीन बस स्टँड, प्रवर्तन चौक, गोदावरी मंगल कार्यालय या मार्गावरून झाली. स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात शस्त्र पूजन करून शिस्तबद्ध संचलन केले. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी रांगोळ्या काढल्या होत्या, तर नागरिक आणि शिवसेना परिवाराकडून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यातून नागरिकांचा संघाच्या कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
मार्गदर्शन आणि अभियानाचे उद्दिष्ट
यावेळी व्यासपीठावरून प्रमुख पाहुणे म्हणून भावराव महाराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते अमोल पांडुरंग खलसे यांनी स्वयंसेवकांना संबोधित केले. त्यांनी पथसंचलन आणि शस्त्र पूजनाचे महत्व स्पष्ट केले. तालुका संघचालक डॉ. मनोज महाजन यांनी प्रास्ताविक केले, तर राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
अमोल खलसे यांनी सांगितले की, येणाऱ्या विजयादशमी २०२६ पर्यंत देशातील स्वयंसेवक प्रत्येक गावांमध्ये आणि घराघरात जाऊन संघाच्या १०० वर्षांतील उपलब्धी, उद्दिष्टे आणि जनजागृती याची माहिती देतील. या अभियानाचा मुख्य उद्देश समाजात एकता आणि राष्ट्रीयतेची भावना मजबूत करणे आहे.
या अभियानादरम्यान संघ पुढील पाच प्रमुख संकल्पांना गावागावात आणि घराघरात पोहोचवणार आहे:
1.सामाजिक समरसता
2.कुटुंब प्रबोधन
3.पर्यावरण संरक्षण
4.नागरिक कर्तव्य
5.स्वदेशी भाव जागरण
मुक्ताईनगर तालुक्यात संघाचे शताब्दी वर्षानिमित्त सुरू झालेले हे संपर्क अभियान समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.