पणजी, 12 मार्च (हिं.स.) – गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) ने हैदराबाद येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), तंत्रज्ञान भागीदार नीर इंटरॅक्टिव्ह सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंटर फॉर जिओस्पेशियल एआय अँड डिजिटल ट्विन्स (सीजीडीटी) तसेच आंध्र महिला सभा (एएमएस) कला आणि विज्ञान महाविद्यालय यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून जहाजबांधणी नवोन्मेषाचे एक नवीन युग सुरू होईल.
10 मार्च रोजी स्वाक्षरी करण्यात आलेल्या या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट भारतातील जहाजबांधणी आणि सागरी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, जिओस्पेशियल डिजिटल ट्विन सोल्यूशन्स, इंडस्ट्री 4.0 तत्त्वे आणि क्यूए 4.0 धोरणांचा वापर करणे आहे. हे सहकार्य गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि आयआयटी हैदराबाद या दोघांच्या तांत्रिक क्षमता आणि संसाधनांना बळकटी देईल. त्यामुळे जहाज डिझाइन, सुरक्षा आणि कार्यान्वयन कार्यक्षमतेच्या विविध पैलूंमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास मदत होईल.
या भागीदारीद्वारे, या संस्था गरजेनुसार जहाज डिझाइन करण्याच्या प्रक्रियेवर, शिपयार्डची सुरक्षा वाढवण्यावर आणि उद्योगात परिवर्तन घडवून आणण्याचे आश्वासन देणाऱ्या प्रगत डिजिटल पर्यायांची अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करतील. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून तयार करण्यात आलेले जनरेटिव्ह डिझाइन, डिजिटल ट्विन्स आणि भू-स्थानिक (जिओस्पॅशिअल) तंत्रज्ञान जहाजबांधणीचा वेग आणि अचूकता सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, तसेच शिपयार्डमध्ये सुरक्षा मानके आणखी दृढ करतील.
ही भागीदारी घडून येण्यात अनेकांनी पुढाकार घेतला, यात गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी.के. उपाध्याय; आयआयटी हैदराबादचे संचालक डॉ. बी.एस. मूर्ती; गोवा शिपयार्ड लिमिटेडचे जीएम (टीएस), Cmde. ए. वासुदेवन (निवृत्त); नीर इंटरॅक्टिव्ह सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय शंकर अलुरु; आणि एएमएसचे अध्यक्ष दिट्टकवी चक्रपाणी आयएएस (निवृत्त), यांचा समावेश होता.
ही भागीदारी भारताच्या जहाजबांधणी उद्योगात एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या भागीदारीमुळे या उद्योगाला अधिक कार्यक्षमता, वाढीव सुरक्षा मानके आणि शाश्वततेवर भर देणारे आशादायक भविष्य लाभणार आहे. जहाजबांधणी प्रक्रियेत उत्पादकक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे जहाजांची रचना, बांधणी आणि देखभाल प्रक्रिया नव्याने परिभाषित होऊन भारताच्या सागरी क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडून येईल.