मुंबई, 12 मार्च (हिं.स.)। – मराठी माणसाची आठवण फक्त निवडणुकीपुरती न आणता मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत राहायला यावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्यासाठी मुंबई बँकेच्या स्वयंपुनर्विकास मॉडेल देखील उपयुक्त ठरणार असून जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती देखील त्यांनी केली. मुंबईतील अभ्युदय नगरमधील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५१ व्या शाखेचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना, 50 वर्षांमध्ये 50 शाखा हा टप्पा ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवल्यामुळेच मुंबई बँकेला शक्य झाले असल्याचे मत व्यक्त केले. हा टप्पा गाठण्यासाठी सक्षम नेतृत्वाची देखील गरज असून ते प्रवीण दरेकर यांच्या रूपाने मुंबई बँकेला मिळाले असल्याचे मत व्यक्त केले. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात ग्रोथ आणणारी ही बँक आहे. गिरणी कामगार, गरीब नोकरदार यांच्यापासून सर्वांच्या मनात आपल्याबद्दल आपुलकी निर्माण करण्यात ही बँक यशस्वी ठरली आहे. हातावर पोट असलेल्यापासून ते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या पर्यंत सगळ्यांचे पैसे बँकेने जपले आहेत. अनेक अवघड प्रसंगी मदत करून बँकेने आपले सामाजिक उत्तरदायित्व देखील जपले आहे. आजच्या मितीला बँकेकडे लाडक्या बहिणींचे 25 कोटी रुपये जमा असून त्यांना 25 हजारापर्यंत कर्ज देणारी
योजना बँकेने सुरू केली आहे हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगितले. बँकेने हा निर्णय घेतल्याने मुंबई बँक माझी लाडकी बँक झाली असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
मुंबई बँकेने सुरू केलेली स्वयंपुनर्विकास योजना ही अत्यंत उपयुक्त योजना असून अन्य बँकांनी देखील मुंबईत या योजनेचे अनुकरण करावे यासाठी सहकार मंत्र्यांनी प्रयत्न करावे अशी विनंती त्याना केली. तसेच सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सुरू केलेली ही अत्यंत धाडसी योजना असून त्यात सहभागी होण्यासाठी आतापर्यंत 1600 अर्ज त्यांच्याकडे आले आहेत ही जमेची बाजू असल्याचे मत व्यक्त केले. मुंबई बँकेला लागेल ती सर्व मदत करायला शासन नक्की प्रयत्न करेल असे सांगितले. तसेच सहकार कार्यालयाच्या जागेबाबत काही आक्षेप असल्यास त्याबद्दल मंत्रालयात बैठक घेऊन लोकांना सोयीस्कर ठरेल अशाच ठिकाणी हे कार्यालय करू असे सांगितले.
तसेच, ज्या अभ्युदय नगरात ही शाखा सुरू होत आहे, त्या अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित असून याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल असे जाहीर केले. मुंबईतील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. त्या अंतर्गत रमाबाई आंबेडकर नगरमधील 17 हजार घरांचा पुनर्विकास एसआरए आणि एमएमआरडीए मिळून करत आहेत. याच प्रकारे सात शासकीय यंत्रणाना एकत्रित आणून मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगितले. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत राहायला यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून अभ्युदय नगरसह, मोतीलाल नगर आणि इतर वसाहतींच्या पुनर्विकासाला नक्की प्राधान्य देऊ असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालक प्रसाद लाड, शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, माजी नगरसेविका आशा मामेडी आणि अभ्युदय नगरमधील सर्व रहिवासी उपस्थित होते.
*म्हणून महाविकास आघाडीचा टांगा पलटी केला…*
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना अटक करण्याचे प्लॅनिंग सुरु झाले होते. त्यात अजूनही काही नावे होती, मला ते सगळे प्लॅनिंग समजलेही होते. या पापाचे आपण धनी व्हायला नको त्यामुळे मी माझा वेग वाढवला आणि महाविकास आघाडीचा टांगा वेळीच पलटी करून टाकला असे यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले. मराठी माणसाला माज आहे असं म्हणत मराठी माणसाची जाहीर बदनामी करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला बळ देण्यासाठी शिवसेनेची सुरुवात केली, मात्र या मूळ तत्त्वाचाच अनेकांना विसर पडलेला दिसतोय असे मत यावेळी बोलताना शिंदे यांनी व्यक्त केले.