पुणे, 10 मार्च (हिं.स.) : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे काँगेस सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. धंगेकर यांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की त्यांनी काँग्रेसला आता रामराम केला आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषदेत रवींद्र धंगेकर म्हणाले, “अशा प्रकारचा (पक्ष सोडण्याचा) कोणताही निर्णय हा प्रचंड कठीण असतो.” माजी आमदार धंगेकर म्हणाले,
“मी गेल्या १०-१२ वर्षांपासून या पक्षाबरोबर काम करत आहे. पक्षाबरोबर एक कौटुंबिक नातं तयार झालं आहे. पक्षातील सहकारी हे कुटुंबातील सदस्य बनले आहेत. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. मी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली, विधानसभा निवडणूक लढवली, या काळात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी माझ्यामागे मोठी ताकद उभी केली. त्यांच्या जोरावरच मी त्या निवडणुका लढवू शकलो. मी निवडणुकीत पराभूत झालो ती वेगळी गोष्ट आहे. मात्र, पक्षातील लोकांनी माझ्यासाठी कष्ट केले. सर्वांनी माझ्याबरोबर ताकद उभी केली होती. त्यामुळेच आता पक्ष सोडताना मला खुप दुःख होत आहे.