लातूर, 10 मार्च (हिं.स.)।हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सध्या वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासूनच अनेक भागात तापमान वाढत आहे. जिल्ह्याच्या तापमानाचा पारा देखील वाढतो आहे. सर्व साधारणपणे एखाद्याप्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ अंश सेल्शियसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान ४५ अंश सेल्शियसपेक्षा जास्त असेल तर त्याभागात उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे, जुन या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. परिणामी, उष्माघातामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते.
उष्माघातासाठी अती जोखमीचे घटक
उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध व्यक्ती व लहान मुले, गरोदर महिला, स्थूल व्यक्ती व पुरेशी झोप न झालेले व्यक्ती, मधुमेह, हदयविकार, दारूचे व्यसन असणारे लोक, घट्ट कपडे घातलेले लोक, निराश्रीत, बेघर लोक, कारखान्यात बॉयलर जवळ काम करणारे लोक अशा अति जोखमीच्या लोकांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. अतिजोखमीच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहीजे. उष्णतेमुळे होणारा शारीरिक त्रास किरकोळ स्वरूपाचा किंवा गंभीर स्वरूपाचा असतो.
लक्षणे
किरकोळ त्रासात उष्णतेमुळे थकवा येणे, ताप येणे, शरीरावर रॅश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात. तर, गंभीर त्रासात उष्माघातामुळे त्वचा कोरडी पडणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुध्द अवस्था अशा लक्षणासह मृत्यूही होऊ शकतो.
प्रतिबंधात्मक उपाय
हे करा …
पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे फिकट रंगाचे (पांढरे) सैलसर कपडे वापरा. उन्हात चष्मा, छत्री, टोपी व पादत्राणे वापरा. ओलसर पडदे (वाळ्याचे), पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा. शक्य असल्यास उन्हात जाण्यापुर्वी सनस्क्रिन क्रिम वापरा किंवा कोरफडीचा गर लावा. सरबत किंवा जलसंजीवनीचा वापर करा.
हे करू नये …
कष्टाची कामे उन्हात करू नका. शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणेटाळा. लहान मुलांना पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नका. गडद रंगाचे तंग कपडे वापरू नका. मद्यपान, चहा, कॉफी, शीतपेय टाळा. खुप प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. उन्हाच्या काळात भर दुपारी स्वयंपाक करणे टाळा व स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.
प्रथोमचार…
रुग्णास वातानुकुलीत खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कुलर ठेवावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. आईसपॅक लावावेत. रुग्णाला जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे.
आरोग्य विभाग सज्ज :
येऊ घातलेल्या उन्हाळ्यात उष्माघात प्रतिबंध व नियंत्रणाकरिता आरोग्य विभागाची पूर्वतयारी पूर्ण झालेली असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून आवश्यक औषधीसाठा उपलब्ध करून आरोग्य यंत्रणा सतर्क व सज्ज ठेवण्यात आलेली आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी दिवसांमध्ये जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवू शकते, अशा परिस्थितीत उष्माघात होऊ नये, यासांठी नागरिकांनी आता पासूनच सजग रहावे व प्रतिबंधात्मक उपायावर अधिक भर द्यावा. तसेच, उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.