नवी दिल्ली, 8 मार्च (हिं.स.) : दैनंदिन कार्यालयीन तसेच घरगुती कामकाजातून सवड काढून महिला दिनाच्या पूर्व संध्येला सनदी अधिकारी, डॉक्टर्स महिलांनी मनोरंजनात्मक खेळ खेळून, मेहंदी लावून तसेच अस्सल मराठी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत हलक्या फुलक्या वातावरणात जागतिक महिला दिवस साजरा केला.
महाराष्ट्र सदनच्या सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांच्या पुढाकारातून नवीन महाराष्ट्र सदन येथे शुक्रवारी सायंकाळी जागतिक महिला दिवसाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ सनदी , केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागात कार्यरत उच्चपदस्थ, आय ए एस वाइफ असोसिएशन च्या सदस्या, महाराष्ट्र सदनाच्या व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या महिला अधिकारी तसेच महिला कर्मचारी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेत.
यावेळी उपस्थित सर्व महिलांनी त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या खेळांमध्ये उत्साहपूर्वक सहभाग घेतला. वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या महिलांनी स्वपरिचय करून दिला. सांभारवडी, वडापाव, कांदी भजी अशा अस्सल महाराष्ट्रयीन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत हलक्या फुलक्या वातावरणात जागतिक महिला दिवस साजरा होणे हे वेगळेपण ठरले, हे विशेष. कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सहभागी महिलांनी आनंद व्यक्त करत निवासी आयुक्तांचे आभार मानले.