नवी दिल्ली, 04 मार्च (हिं.स.) : एखाद्याला ‘मियाँ-तियाँ’ किंवा ‘पाकिस्तानी’ म्हणणे चुकीचे असले तरी भादंविचे कलम 298 अंतर्गत धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्यात मोडत नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणातील 80 वर्षीय हरि नारायण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली.
झारखंडमधील बोकारो येथील चास येथील उपविभागीय कार्यालयात उर्दू भाषांतरकार आणि कार्यवाहक लिपिक (माहितीचा अधिकार) मोहम्मद शमीमुद्दीन यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. शमीमुद्दीन यांच्या आरोपानुसार माहिती अधिकार अर्जासंदर्भात माहिती देण्यासाठी ते अपीलकतेर्ते हरि नारायण सिंह यांच्याकडे गेले असता हरि नारायण सिंह यांनी त्यांना ‘मियाँ-तियाँ’ आणि पाकिस्तानी म्हणून संबोधले. शमीमुद्दीन यांच्या तक्रारीनुसार हरि नारायण सिंह यांविरुद्ध कलम 298 (धार्मिक भावना दुखावणे), 504 (जाणीवपूर्वक अपमान आणि शांतता भंग), 506 (गुन्हेगारी कट रचणे), 353 (सरकारी सेवकाशी गैरवर्तन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी हरि नारायण सिंह यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. तसेच जुलै 2021 मध्ये, दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत संशयित आरोपीवर समन्स जारी केले. हरि नारायण सिंह यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि त्यानंतर उच्च न्यायालयात अपील दाखल केले. मात्र दिलासा न मिळाल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
संबंधित याचिकेवर न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यासंदर्भातील निकालात सर्वोच्च न्यायालयान म्हणाले की, “एखाद्याला ‘मियाँ-तियाँ’ किंवा ‘पाकिस्तानी’ म्हणणे निःसंशयपणे चुकीचे आहे. पण या प्रकरणात याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. या टिप्पण्या चुकीच्या होत्या. परंतु, हे प्रकरण भादंविचे कलम 298 अंतर्गत धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्यात मोडत नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने हरि नारायण सिंह यांच्यावरील धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणाचा खटला फेटाळून लावला