शिर्डी, 4 मार्च (हिं.स.)। शिवसेना, युवासेना ही निवडणुकीला समोर बघून काही काम करत नसते तर ३६५ दिवस जनतेची सेवा करण्यासाठी आज आमची शिवसेना, युवासेना महाराष्ट्रामध्ये काम करत आहे, असे प्रतिपादन युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश प्रताप सरनाईक यांनी केले. युवासेनेच्या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचा युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा टप्पाचा समारोप आज (दि. ४) रोजी शिर्डी येथे संपन्न झाला.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, युवा खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना कार्याध्यक्ष श्री. पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक, युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे, युवासेना सचिव किरण साळी, श्री. अविष्कार भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा टप्पा (दि. २ मार्च ते दि. ४ मार्च ) संपन्न झाला.
सदर दौऱ्यासाठी पुर्वेश सरनाईक यांनी ठाणे ते जळगाव असा रेल्वे प्रवास केला. त्यानंतर त्यांनी जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि शिर्डी येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. नंदुरबारमध्ये युवासेनेचा भव्य मेळावा पार पडला ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने युवसैनिकांनी हजेरी लावली. या दौऱ्याच्या माध्यमातून युवासेनेच्या कार्यकर्त्यांना संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या दौऱ्यामुळे शिवसेना युवासेनेची ताकद अजून वाढली असून आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी ही बैठक महत्वपूर्ण ठरली आहे.
सपा आमदार अबू आझमी यांच्या विरोधात पोलिस आयुक्तांना दिले पत्रक –
पुर्वेश सरनाईक यांनी नाशिक येथे पोलीस आयुक्तांशी भेट घेतली आणि खास पत्रकाद्वारे सपा आमदार अबू आझमी यांनी केलेल्या औरंगजेबाच्या प्रशंसेवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी पोलिस आयुक्तांना हे पत्रक दिले आणि त्वरित कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या यशामध्ये युवासेनेचा मोठा वाटा
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकींमध्ये जे यश आमच्या महायुतीला प्राप्त झालं त्यामध्ये युवासेनेचा खूप मोठा हात होता, असे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यावेळी म्हणाले. तसेच, सर्व युवासैनिकांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना अधिक ताकद देण्यासाठी या दौरा करण्यात येत आहे.