Muktainagar News : येथील मुख्य प्रवर्तन चौकात मध्यप्रदेशातून आलेल्या वाहनावर करवाई करत लाखों रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे हे वाहन पकडल्या गेले. सदरची कारवाई सायंकाळी सात ते साडेसात वाजेदरम्यान घडली. एकीकडे विधान परिषदेत आ. एकनाथ खडसे यांनी विमल गुटखा व अवैध धंदे टार्गेट केले असताना विमल गुटखा गाडी सोडविण्यासाठी मात्र त्यांच्याच एका पदाधिकाऱ्यांची तळमळ कारवाई सुरू असताना दिसून आली. त्यामुळे ये रिश्ता क्या कहलाता हैं अशा चर्चांना उत आला होता. तसेच या गुटखा तस्करी मागील मुख्य मास्टर माईंड व त्याला संरक्षण देणारा राजाश्रय देखील उघडा पडला पाहिजे अशी मागणी सर्व सामन्य जनतेतून होत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरकडून बोलेरो क्रमांक MH 19 CY 4792 हे वाहन मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात सायंकाळी पावणे सात ते सात वाजेच्या दरम्यान आले. सदर वाहन बऱ्हाणपूर रोडवर बंद पडले आणि त्या वाहनामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे गजबजलेल्या भागात लोकांची गर्दी झाली व सदर बंद पडलेल्या वाहनात नेमकं काय आहे असे पाहिले असता त्या ठिकाणी ताडपत्री च्या आत विमल गुटखा असल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्वत्र ही चर्चा पसरत या वाहनाच्या भोवती मोठी गर्दी जमा झाली. यामुळे वाहतूक ठप्प झाली त्यानंतर लगेचच दोन-तीन पोलीस त्या ठिकाणी हजर झाले आणि लोकांनी ते बंद पडलेले वाहन ढकलत छत्रपती शिवाजी उद्यानाजवळ भुसावळ रोडवर आणले. त्यानंतर वाहन पोलीस ठाण्यात नेले. परंतु या ठिकाणी एक ते दीड तास या वाहनाभोवती लोकांची खूप गर्दी झाली होती. रात्री उशीरापर्यंत पोलीस स्टेशनला कुठलीही नोंद नव्हती. दरम्यान, विमल गुटखा वाहून येणाऱ्या वाहनावर पोलीस यंत्रणा कठोर कारवाई करणार का? असा सवाल जनमानसातून उपस्थित केला जात होता.